Friday , December 12 2025
Breaking News

खानापूर तालुक्यातील मराठी जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना ओळखा : बाळासाहेब शेलार

Spread the love

 

खानापूर : मध्यवर्तीशी संलग्न असलेल्या खानापूर तालुका समितीच्या बैठकीत त्या गटातील समिती नेत्यांनी एका वृत्तवाहिनीला एकीसंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. त्या प्रतिक्रियांसंदर्भात 15 ऑक्टोबर रोजी “बेळगाव वार्ता”ने माझी प्रतिक्रिया प्रसारीत केली. पण त्या माझ्या प्रतिक्रियेवर काही कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांद्वारे उलटसुलट चर्चा सुरू केली आणि एकी बारगळण्यासाठी दिगंबर पाटील गट जबाबदार आहे तसेच गोपाळराव देसाई गटाबाबत अपप्रचार केला आहे अश्या आशयाचे वृत्त त्यांच्याच गटातील कार्यकर्त्यांकडून पसरविले जात आहे. त्याबद्दलचा खुलासा बाळासाहेब शेलार करत आहेत.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीशी संलग्न असलेल्या समितीत गट तट विसरून विलीन व्हावे, असे आवाहन श्री. गोपाळराव देसाई गटाने केले आहे. सर्वप्रथम गोपाळ देसाई गटाने हे समजून घ्यावे की मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना 1984 मध्ये झालेली आहे आणि ती खानापूर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय कै. व्ही. वाय. चव्हाण साहेबांच्या पुढाकाराने झालेली आहे, त्यामध्ये आम्हाला विलीन होण्यास गोपाळराव देसाई सांगत आहेत या गोपाळ देसाईंना मध्यवर्ती समितीमध्ये सदस्य म्हणून कुणी नेमणूक केली याचा बहुदा यांना विसर पडला असावा. आम्हास विलीन होण्यास सांगण्यापेक्षा आपली वर्णी मध्यवर्तीवर कोणी लावली हे सांगितले असते ते बरे झाले असते, आम्ही कोणत्याही गटामध्ये विलीन होण्याचा संबंधच येत नाही कारण मध्यवर्ती समिती ही सर्व घटक समितीच्या नेत्यांनी स्थापन केलेली समिती आहे. त्यामुळे सर्वप्रथम घटक समिती बळकट केली पाहिजे. घटक समिती बळकट तर मध्यवर्ती बळकट त्यामुळे घटक समिती बळकट करणे ही काळाची गरज आहे हे विसरून चालणार नाही. मी काल “बेळगांव वार्ता”ला प्रतिक्रिया देत असताना आतापर्यंत एकिसंदर्भात झालेल्या घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी गोपाळराव देसाई असलेल्या घटक समितीबद्दल अपप्रचार केलेला नाही. कारण गोपाळराव देसाई गट असलेल्या नावाची घटक समिती खानापूरमध्ये अस्तित्वातच नाही. खानापूरमध्ये खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती अस्तित्वात आहे आणि आम्ही तिला आमची “आई” मानतो आणि आपल्याच आईचा अपप्रचार आम्ही करत नाही. 24 मार्च 2022 रोजी तीर्थक्षेत्र हब्बनहट्टी येथे जी बैठक झाली त्या बैठकीत दोन्ही गटाचे किती किती सदस्य उपस्थित होते आणि कोणी काय प्रतिक्रिया दिल्या त्याचा तपशील सह्यानिशी आमच्याकडे आहे त्याची प्रत आम्ही देण्यास तयार आहोत. त्या बैठकीचा व्हिडीओदेखील प्रसारित झालेला आहे. उद्याच्या पेपरमध्ये काहीतरी बातमी यावी म्हणून मारुती परमेकर यांनी बिनशर्त एकी झाली असे घोषित केले असे काही जण सांगत आहेत त्यांचे हे वक्तव्य म्हणजे बालिशपणाचा कळस म्हणावा लागेल. असे वक्तव्य करणाऱ्यांनी सर्वप्रथम मारुती परमेकर यांच्या कार्याचा आढावा घ्यावा. ते 1969 पासून समितीच्या कार्यात आहेत. ते एक निष्ठावंत अभ्यासू नेते म्हणून परिचित आहेत. अशा अभ्यासू व प्रामाणिक नेत्याबद्दल अश्या प्रकारचे वक्तव्य करणे कितपत योग्य आहे? 24 मार्च च्या बैठकीतील निर्णय जर मान्य नव्हता तर त्यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन परमेकरांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही असे का नाही सांगितले? जर यांना बिनशर्त एकीचा निर्णय मान्य नव्हता तर हे सर्वजण 4 एप्रिल 2022 रोजी झालेल्या बैठकीत का उपस्थित राहिले. 24 मार्च ते 4 एप्रिल म्हणजे जवळपास 11 दिवस गप्प का बसले? आणि राष्ट्रपती आदर्श शिक्षकांनी बैठकीच्या सुरुवातीलाच वाद घातला असा आरोप करणाऱ्यांनी याच आदर्श शिक्षकांनी मनाचा मोठेपणा दाखवत समितीवर असलेली कोर्टकेस क्षणाचाही विलंब न करता मागे घेतली हे सांगायला सोईस्करपणे विसरले तसेच हेच आदर्श शिक्षक आबासाहेब दळवी व निवृत्त शिक्षक डी. एम. भोसले गुरुजी यांच्या प्रयत्नांमुळेच हब्बनहट्टी येथे दोन्ही गट एकत्र आले त्यांनाच दोष देणे कितपत योग्य आहे?
माजी आमदार दिगंबर पाटील यांनी आपण मध्यवर्तीला मानणार नाही असे वक्तव्य केले असा आरोप हे लोक करत आहेत मग मध्यवर्तीच्या नेत्यांनी दिगंबर पाटील यांना जी वागणूक दिली ती योग्य होती का? समितीचे आमदार हे मध्यवर्तीचे पदसिध्द सदस्य असतात असे असताना मध्यवर्तीच्या नेत्यांनी माजी आमदार दिगंबर पाटील यांना निलंबित केले (असे सर्व वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहे) या निलंबन प्रक्रियेचा अधिकार मध्यवर्तीला आहे का? आणि जर निलंबनचा अधिकार मध्यवर्तीला आहे तर समितीच्या नावावर आमदारकी भोगलेल्या आणि आता आमदारकीच्या लालसेपोटी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार अरविंद पाटील यांना मध्यवर्तीने का निलंबित केले नाही किंबहुना या आमदारांचा निषेध देखील नोंदविला नाही याचे स्पष्टीकरण स्वतःला मध्यवर्तीशी संलग्न समजणारे तथाकथित नेते याचे स्पष्टीकरण देतील का? मध्यवर्तीच्या या भूमिकेवर दिगंबर पाटील यांनी आपले मत मांडले किंवा मध्यवर्ती बरखास्त करून पुनर्रचना करण्यात यावी अशी मागणी केली तर त्यात गैर ते काय?
4 एप्रिल रोजी शिवस्मारक येथे
आयोजित केलेल्या दोन्ही गटाच्या बैठकीत श्री. देवाप्पा गुरव, माजी आमदार दिगंबर पाटील, मारुती परमेकर, सुरेश देसाई, यशवंत बिर्जे, जगन्नाथ बिर्जे, पुंडलिक चव्हाण मामा ही सर्व मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. त्यावेळी 15 सदस्यांची कमिटी करून पुढील चर्चा करण्यात येईल असे परमेकर साहेबांनी जाहीर केले या बातमीची कात्रण माझ्याकडे आहे. कुप्पटगिरी येथील सभेला देवाप्पा गुरव यांनी जायचे टाळले असा अपप्रचार हे लोक करत आहेत मात्र या सभेला देवाप्पा गुरव आणि त्यांचे चिरंजीव मारुती गुरव दोघेही उपस्थित होते याची साक्ष दैनिक सकाळचे पत्रकार राजू कुंभार देतील खोटे बोला पण रेटून बोला ही वृत्ती अंगिकारण्याऐवजी एकी करण्यासाठी प्रयत्न केले असते तर आज तालुक्यात वेगळे दृश्य दिसले असते. याच सभेवेळी दुसऱ्या तालुक्यातील समिती कार्यकर्त्यांना का बोलावले असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी हे आधी समजून घ्यावे की प्रत्येक सीमावासीय हे एक कुटुंब आहेत. त्यामुळे विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आमंत्रित केले गेले तर त्यात गैर ते काय?
सीमाप्रश्नाचे अभ्यासक महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब बेळगावात आले असता त्यांची आम्ही भेट घेतली, त्यावेळी 1993 च्या तोडग्यानुसार सीमाप्रश्न सोडावा अशी आम्ही मागणी केली. 1993च्या तोडग्यानुसार असो, इतर चर्चेतून असो किंवा न्यायालयातून असो सीमाप्रश्न लवकरात लवकर सुटावा अशी प्रत्येक सीमावासीयांची इच्छा आहे मग आम्ही 1993 चा तोडगा सुचविला त्यात चुकीचे काय
मध्यवर्तीच्या आदेशानुसार आम्ही दरम्यानच्या काळात मध्यवर्तीने केलेल्या आंदोलनातही सामील झालो. 17 जुने रोजी सह्याद्री सोसायटीच्या सभागृहात आम्ही मध्यवर्तीच्या नेत्यांकडे एकीचा प्रस्ताव घेऊन गेलो, त्यावेळी मध्यवर्तीच्या नेत्यांनी एकी करणे ही काळाची गरज आहे त्यामुळे दोन्ही गटाचे म्हणणे ऐकून एकी करूया असे सांगितले. त्यानुसार ही जबाबदारी प्रकाश मरगाळे यांच्यावर सोपविली होती. मात्र परवाच झालेल्या मध्यवर्तीच्या बैठकीत मालोजीराव अष्टेकर यांनी आपण घटक समितीच्या कामकाजात लक्ष घालणार नाही अश्या वक्तव्याची बातमी देखील दै. पुढारीमध्ये प्रसिद्ध झाली आहे. अष्टेकर साहेबांनी आम्हाला 17 जुनच्या बैठकीत हे वक्तव्य केले असते तर हा प्रश्नच आला नसता. प्रथमतः मालोजीराव अष्टेकर साहेबांनी आपल्या तत्वांशी ठाम राहावे. ज्यांची हयात सीमालढ्यात गेली त्यांच्या तोंडून हे वक्तव्य योग्य आहे का याचा विचारही केला तर बरे झाले असते.
गोपाळराव देसाई यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडीवर आमचा आक्षेप नाही मात्र ज्या पद्धतीने ही निवड बंद दाराआड करण्यात आली त्या प्रक्रियेला आमचा विरोध आहे. एकीची प्रक्रिया अर्धवट ठेवून एवढ्या घिसाडघाईने अध्यक्ष निवड करण्यामागचा नेमका हेतू काय? तालुक्यात इतर प्रामाणिक अभ्यासू ज्येष्ठ नेते मंडळी असताना मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अध्यक्ष निवड केली याचा बोलावता धनी कोण?

About Belgaum Varta

Check Also

आमदार हलगेकर साहेबांच्या पीएची नार्को टेस्ट करा : खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस

Spread the love  खानापूर : शिरोली ग्रा. पंचायतचे सदस्य कृष्णा गुरव व दिपक गवाळकर तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *