खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) येथील ग्रामपंचायतीमध्ये 65 लाख रुपयाचा अपहार झालेल्या आरोपाची जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्याने चौकशी करावी यासाठी नंदगड ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष मन्सूर तहसीलदारसह 21 सदस्यानी नंदगड ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली. गेल्या दोन महिन्यापासून नंदगड ग्रामपंचायतमध्ये 65 लाखाचा भ्रष्टाचार झाला आहे याची चौकशी व्हावी यासाठी ग्रामपंचायत संबंधित खात्याकडे नंदगड पंचायतीच्या सदस्यांनी निवेदन दिले होते. ही निवेदने देऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी कोणतीही कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी 20 ऑक्टोबरपर्यंत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली नाही तर नंदगड ग्रामपंचायत समोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार आजपर्यंत झालेल्या आरोपाची चौकशी झाली नाही म्हणून उपाध्यक्ष मन्सूर तहसीलदारसह 21 ग्रामपंचायत सदस्याने पंचायतीसमोर धरणे आंदोलन छेडले. यावेळी गावातील बऱ्याच लोकांनी झालेल्या आरोपांची सहनिशा व्हावी असे मत मांडून या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला. नंदगड गावातील सामाजिक कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य गुंडू हलशीकर यांनी सुद्धा धरणे आंदोलनस्थळी जाऊन या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. तसेच ग्रामपंचायतमध्ये झालेल्या आरोपांची प्रशासनाने दखल घेऊन कसून चौकशी करावी कारण झालेल्या आरोपामुळे गेल्या दोन महिन्यापासून पंचायतीचा कारभार हा व्यवस्थित चालताना दिसत नाही. त्यामुळे गावातील जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी या 21 सदस्यांच्या मागणीला दुसरा देऊन चौकशी करावी व हे धरणे आंदोलन लवकरात लवकर संपवून नंदगड गावातील जनतेला दिलासा द्यावा.
Belgaum Varta Belgaum Varta