खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नावावर आमदारकी भूषविलेल्या खानापूर तालुक्यातील एका माजी आमदारांचा उद्या मुख्यमंत्री बोम्माई यांच्यासमोर शक्तिप्रदर्शनाचा केविलवाणा प्रयत्न अपयशी ठरला आहे.
सध्या भाजपवासीय असलेल्या माजी आमदारांनी खानापूर तालुक्यातील मणतुर्गे येथील कट्टर समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत काढलेला एक फोटो सध्या समाजमाध्यमाद्वारे सर्वत्र फिरत आहे. त्यांच्यासोबत मणतुर्गे येथील समितीनिष्ठ कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश असा धादांत खोटा संदेश देखील दिला जात आहे. मात्र मणतुर्गे गावातील समितीचे कार्यकर्ते प्रल्हाद मादार आणि ईश्वर बोबाटे यांनी “बेळगाव वार्ता”च्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, दि. 7 नोव्हेंबर रोजी मणतुर्गे येथे विठ्ठल रुखुमाई मंदिरासमोर टिपलेला हा फोटो आहे. माजी आमदार अरविंद पाटील यांच्यासमवेत मणतुर्गे गावातील दहा-पंधरा युवक या फोटोत दिसत आहेत. विशेष म्हणजे हे सगळे म. ए. समितीचे कार्यकर्ते आहेत. म. ए. समितीला शंभर टक्के मतदान करून दोनदा सन्मान प्राप्त केलेल्या एका सच्या समिती प्रेमी गावातील हे कार्यकर्ते आहेत. अरविंद पाटील समितीत असताना आम्ही जरूर त्यांच्यासोबत काही काळ काम केले आहे. मात्र आज ते भाजपाचे झाले आहेत. म्हणून आम्हीही त्यांच्यासोबत भाजपात जाणार नाही. आम्हा समिती कार्यकर्त्यांसोबत त्यांनी प्रेमाने काढलेला फोटो आम्ही केवळ मैत्री खातर त्यांना दिला. मात्र त्यांनी त्याच भांडवल करून आम्हालाही कोणी भाजप कार्यकर्ते समजत असतील तर तो त्यांचा गैरसमज आहे.
आम्ही केवळ समिती कार्यकर्त्यांना आणि माजी आमदारांना आमची भूमिका सांगायला गेलो होतो. उगाच कुणाची हुजरेगिरी करीत तत्व विकणारे आम्ही नाही. सूर्योदय ग्रुपच्या माध्यमातून गेली 25 वर्षे आणि आता मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानकडून दहा वर्षे मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनात आम्ही कार्यरत आहोत. मराठी आमच्या रक्तात भिनली आहे. स्वार्थापोटी कुणाच्या ताटाखालचे मांजर होणारे आम्ही नाही. समितीच्या जीवावर मोठे झालेल्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना गृहीत धरून आपल्या सोयीचे राजकारण करू नये. आम्ही आमच्या ठिकाणी ठाम आहोत. मराठी बद्दलचा आदर आम्हाला कोणी शिकवू नये. आमचं मराठी प्रति असलेलं प्रेम बेगडी नाही. आम्ही म. ए. समितीचे कार्यकर्ते आहोत. न्याय मिळेपर्यंत सीमालढ्याशी बांधील आहोत. भलेही मरेपर्यंत झुंजावं लागलं तरी झुंजत राहू. कुणीही आमच्या या फोटोचा वेगळा अर्थ काढू नये. आम्ही सगळ्या युवकांसमक्ष माजी आमदारांना मान राखून जे काही सांगायचं होतं ते सांगितलेलं आहे. फोटोमुळे गैरसमज नसावा, मराठीचा घात करणार नाही, करूही देणार नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
उद्या होणाऱ्या एकीच्या प्रक्रियेत बाधा आणण्याच्या हेतूने माजी आमदारांच्या काही हस्तकांनी सदर फोटो मध्यवर्तीच्या नेत्यांना देखील पाठविला असल्याचे समजते.
Belgaum Varta Belgaum Varta