
खानापूर : दोन गटात विखुरलेली खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीत अखेर मध्यवर्तीच्या पुढाकाराने एकी झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत मराठी भाषिकांनी एकत्र येऊन मराठीची ताकद दाखवून देण्यासाठी मध्यवर्तीने खानापूर समितीमध्ये एकी करण्याचा निर्धार केला. त्याअनुषंगाने आज खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत एकीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
शिवस्मारक येथे दोन्ही गटात झालेल्या बैठकीत तालुक्यातील बहुसंख्य समितीप्रेमी नागरिक उपस्थित होते.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची एकीची प्रक्रिया यशस्वी झाली व तालुक्यातील समितीनिष्ठ मराठी माणूस समितीच्या झेंड्याखाली एकत्र आला. त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साह व नवचैतन्य निर्माण झाले आहे.
सकाळी 11 वाजता शिवस्मारक येथे बैठकीला सुरुवात झाली. बैठकीला मध्यवर्तीचे उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील, प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण-पाटील, एम. जी. पाटील, विकास कालघटगी, तसेच दोन्ही गटाचे नेते व समिती कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीला तालुक्यातील ज्येष्ठ सीमासत्याग्रही देखील उपस्थित होते.
या बैठकीला खानापूर समितीच्या कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त करत एकीचे समर्थन केले. दोन्ही गटातील प्रत्येकी चार अश्या आठ जणांची एक कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीने तालुक्याचा दौरा करून प्रत्येक गावातील 2 ते 5 सदस्यांची समिती कार्यकारिणीसाठी नावे नोंदणी केली जाणार आहे व संपूर्ण तालुक्याची कार्यकारिणी करून अध्यक्ष निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. आठ जणांच्या कमितीमध्ये प्रकाश चव्हाण, यशवंत बिर्जे, हणमंत मेलगे, रमेश धाबाले, धनंजय पाटील, गोपाळ देसाई, राजू पाटील, किशोर हेब्बाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या 15 दिवसात तालुक्याचा दौरा करून नावे नोंदणी पूर्ण झाल्यानंतर खानापूर तालुका समितीची कार्यकारिणी करण्यात येणार आहे.
समितीमध्ये असलेल्या दुहीमुळे समितीची पिछेहाट झाली होती मात्र आगामी विधानसभा, तालुका-जिल्हा पंचायत निवडणुकित मराठी माणसाची ताकद दाखवून देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. एकीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई यांची संकल्प यात्रा सुरू होण्यापूर्वी समितीमध्ये एकी झाल्यामुळे राष्ट्रीय पक्षाचे अवसान गळाले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta