खानापूर : हेम्माडगा-खानापूर रस्त्यावर मणतुर्गे गावानजीक रेल्वे गेट जवळच्या रस्त्याची नुकताच डागडुजी करण्यात आली आहे. मात्र हा रस्ता करत असताना खडी ऐवजी मोठे बोल्डर वापरण्यात आले आहेत त्यामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
हेम्माडगा मार्गे गोव्याला जाणारी वाहने देखील या रस्त्यावरून ये-जा करत असतात. या मार्गे होणारी अवजड वाहनांमुळे ही खडी इतरत्र पसरत आहे व रस्त्यात चर निर्माण झाली आहे. त्यामुळे मोटारसायकल व लहान गाड्या, रिक्षा व इतर वाहनधारकांना या मार्गाने प्रवास करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लहान गाड्या अडकून पडत आहेत तर दुचाकी देखील रस्त्यावरून घसरत आहेत. त्यामुळे अपघातांच्या भीतीने दुचाकीस्वार जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.
सकाळच्या वेळेत कामानिमित्त खानापूरला येणार्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे रहदारी वाढलेली असते व खराब रस्त्यामुळे वाहने सावकाश चालवावी लागतात त्यात रेल्वे जात असताना गेट पडला की वाहनधारकांना थांबावे लागते त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.
याबद्दल आमच्या प्रतिनिधींशी बोलताना समाजसेवक ईश्वर बोबाटे म्हणाले की, आपण या रस्त्याची समस्या स्थानिक लोकप्रतिनिधींना वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले. तरी संबंधित खात्याने योग्य ती उपाय योजना करून या रस्त्याची समस्या तात्काळ सोडवावी, अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta