

रुमेवाडी क्राॅसवरील पणजी- बेळगाव महामार्गावर घटना
खानापूर : खानापूर शहराला लागून असलेल्या रूमेवाडी क्राॅसवरील पणजी- बेळगाव महामार्गावर टिप्परने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले. दुसऱ्या दुचाकीवरील एकटा गंभीर जखमी झाला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील बिडी हिंडले गावचे प्रदीप मारूती कोलकार (वय ३७) व ऐश्वर्या गुरणावर राहणार तोलगी (वय २०) हे दोघे जागीच ठार झाले. आणखी एक वनखात्याचा कर्मचारी दुचाकीवरून येत असताना त्याला धडक बसताच त्याने गाडीवरून उडी घेतली त्यामुळे तो गंभीर जखमी झाला मात्र बचावला.
पणजी-बेळगाव महामार्गावरील रूमेवाडी क्राॅसवरील रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. रस्ता अतिशय खराब झाला आहे. त्यातच टिप्पर रेल्वेचे सिमेंट पोल घेऊन खानापूरकडे जात असताना वाहनचालकाचा ताबा सुटला व दोन दुचाकींना जोराची धडक दिली. त्यात दोघे जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला लागलीच उपचारासाठी बेळगाव येथे हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तर भाजपचे नेते विठ्ठलराव हलगेकर यांनी मृताच्या नातेवाईकांना भेटून त्यांचे सांत्वन केले.
करंबळ क्रॉस ते खानापूर मासळी बाजार या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. वारंवार मागणी करून देखील तात्पुरती डागडुजी करण्यापलीकडे प्रशासन काही करत नाही. आतातरी स्थानिक लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे लक्ष देतील का? असा सवाल नागरिक करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta