पोलिस बंदोबस्त कायम : आरटीपीसीआर रिपोर्टची मागणी
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणार्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्र व इतर राज्यातून येणार्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
शेजारीच असणार्या महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊन शिथील झाला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्या वाहनांची संख्या वाढली आहे. येथील राष्ट्रीय महामार्गावर असणार्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्र व इतर राज्यातून येणार्या प्रवाशांच्याकडे आरटीपीसीआर रिपोर्टची मागणी करण्यात येत आहे. ज्या प्रवास यांच्याकडे रिपोर्ट आहे अशा प्रवाशांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे.
येथील सीमा तपासणी नाक्यावर महसूल, पोलीस, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग यांच्यावतीने कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
निपाणी मंडल पोलीस निरीक्षक आय. एस. गुरुनाथ व निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक बी. एस. तलवार यांच्या मार्गदर्शनाखाली 30 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
या ठिकाणी पीएसआय नरगती, एएसआय एम. एस. लाटकर, एस. बी. माळगे, भाऊसाहेब बेवनूर, होमगार्ड नाईकवाडे, आर. डी. मुलतानी यांच्यासह आरोग्य विभागाच्या सुमन पुजारी, शिक्षण विभागातर्फे शीतल पाटील, सदानंद शिंदे, एस. बी. गोरे, आशा कार्यकर्त्या वर्षा सूर्यवंशी, अश्विनी जाधव, रंजना खोत, विद्या शिंत्रे आदी या ठिकाणी काम पाहात आहेत.
