कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये सर्वदूर सलग तीन दिवसांपासून वरुणराजाची संततधार सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यात सूर्यदर्शनही झालेले नाही. काहीसी उघडीप त्यानंतर पुन्हा जोरदार सरीवर सरी असा पावसाचा खेळ कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सुरु आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी 10 वाजेपर्यंत राजाराम बंधार्यावर पाण्याची पातळी 35 फुट 6 इंचावर पोहोचली आहे. पंचगंगा नदी पाणी पातळी 39 फुटांवर पोहोचल्यानंतर इशारा पातळी समजली जाते, तर 43 फुटांवर गेल्या धोका पातळीत गणना होते. संततधार पावसाने जिल्ह्यातील 55 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्याचा विपरित परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. अनेक मार्गांवर चिखलाचे साम्राज्य झाल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्येही पाणीसाठा वेगाने वाढत आहे. सोमवारपासून पावसाने वेग पकडला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पावसाच्या सरी सुरु असल्याने नद्यांची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. पंचगंगा नदी घाटावर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अंत्यविधीसाठी असलेला घाटही पाण्याखाली गेला आहे.
सध्या पुराचे पाणी शुक्रवार पेठेतील नदी घाट रस्त्यावर आहे. नदीकाठी असणार्या वसाहतींना पालिका प्रशासनकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी सुतावमळा, शाहूपुरी, बावडा, सिद्धार्थ नगर येथे जावून तेथील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या दृष्टीने तयार राहण्यास सांगितले आहे.