
स्वातंत्र्याच्या 75 वर्षांत भारताने सर्व क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली
कोल्हापूर (जिमाका) : देशाची फाळणी ही कधीही विसरली जाणार नाही अशी दुःखद घटना आहे. दोष आणि हिंसेमुळे आपल्या लाखो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले व हजारो लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. हे वर्ष आपण भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करत आहोत. स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी होत असताना भारताने सर्व क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
14 ऑगस्ट फाळणी स्मृती दिनावर अधारित छायाचित्र प्रदर्शन शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक वसंतराव माने, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, करवीरच्या तहसलिदार शितल मुळे-भांमरे, गट विकास अधिकारी जयवंत उगेल, सिंधी सेंट्रल पंचायत गांधीनगरचे अध्यक्ष गुवालदास कट्टार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, फाळणीच्या जखमा आजही ताज्या आहेत. लाखो लोकांना यावेळी स्थलांतर करावे लागले होते. जगातील सर्वात मोठ्या स्थलांतरापैकी एक होते. ब्रिटीशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी नागरिकांमध्ये आनंद होता. फाळणीमुळे भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पाकिस्तानातून भारतात आणि भारतातून पाकिस्तानात असे मोठ्या प्रमाणात लोकांनी स्थलांतर केले. दोन्ही बाजुंनी हिंसा झाली यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या दिवासाची आठवण म्हणून हा दिवस विभाजन विभिषिका स्मृती दिवस म्हणून साजरा केला जातो.
14 ऑगस्ट हा दिवस फाळणी दिवस अर्थात विभाजन विभीषिका स्मृति दिवस म्हणून पाळताना स्वातंत्र्याचे आणि मानवता जपण्याचे महत्व लक्षात येईल. यातूनच तिरस्काराची आणि अविश्वासाची भावना कमी होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक वसंतराव माने म्हणाले, स्वातंत्र्याची फाळणी झाली त्यावेळीचा इतिहास वेगळा आहे. ब्रिटीश या फाळणीला जबाबदार आहेत. हिंदु आणि मुस्लिम यांचे दोन गट तयार झाले त्यामुळे भारत आणि पाकिस्तान असे दोन देश तयार झाले. फाळणीचा सर्वाधिक फटका महिला आणि मुलांना बसला. फाळणीमुळे लोकांच्या मनात एकमेकांविषयी तिरस्काराची आणि अविश्वासाची भावना निर्माण झाली. या सर्व घटना विसरायच्या म्हंटल्या तरी विसरता येणार नाहीत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी या प्रदर्शनाला खासदार धनंजय महाडिक यांनी भेट देऊन येथील फाळणी कालावधीतील छायाचित्रे पाहिली.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावर, स्वातंत्र्यसैनिक वसंतराव माने व अन्य मान्यवर यांनी छायाचित्र प्रदर्शनाची पाहणी केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक तहसिलदार शितल मुळे भांगरे यांनी केले तर आभार गट विकास अधिकारी जयवंत उगेल यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta