कोल्हापूर : गेल्या 15 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने कर्नाटक जलसंपदा विभागाकडून अलमट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात आले आहे. त्यामुळे अलमट्टी धरण 100 टक्के भरले आहे. अलमट्टी धरणात पाणीसाठा 123.01 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अलमट्टी धरणातील पाणी व्यवस्थापन ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट असल्याचे ही अनेकवेळा लक्षात आलेली बाब आहे. अलमट्टी धरणातील पाणी व्यवस्थापन झालं नाही, तर त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात हे मागील दोन महापुरांमध्ये लक्षात आलं आहे. त्यामुळे अलमट्टी धरणातील पाणीसाठा कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यासाठी नेहमीच टांगती तलवार ठरला आहे.
गेल्या महिन्याभरापासून योग्य नियोजन
अलमट्टी धरणाचे पाणी व्यवस्थापन दोन्ही राज्यातील जलसंपदा विभागाच्या योग्य समन्वयाने झाल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराचे संकट टळले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवलं जात असतानाच नद्यांची पातळी वाढत होती. दुसरीकडे सांगली जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती होती. मात्र, अलमट्टी धरणातून योग्य समन्वयाने विसर्ग वाढवण्यात आल्याने कोणताही फुगवटा निर्माण झाला नाही. त्यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यावर कोणतेही संकट प्रकर्षाने जाणवले नाही.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्यानंतर अलमट्टी धरणाचा विसर्ग हा जवळपास पावणे तीन लाखांपर्यंत वाढवण्यात आला होता.
Belgaum Varta Belgaum Varta