जेवत असताना तलावारीने सपासप वार
कोल्हापूर : सहकुटुंब घरात जेवत असताना करणी केल्याच्या संशयातून घरात घुसून तलवारीने सपासप वार करुन एकाचा निर्घृण खून केल्याची घटना कोल्हापूर शहरात घडली. आझाद मुकबुल मुलतानी (वय 48 वर्षे) असे मृताचे आहे. त्यांच्यावर वार होत असल्याने प्रतिकार करण्यासाठी गेलेल्या सुनेवरही वार केल्याने ती सुद्धा जखमी झाले आहे. हल्लेखोर निखिल रवींद्र गवळी (वय 22 वर्षे) स्वत:हून राजाराम पोलिसांकडे हजर झाला. त्यामुळे या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. कुटुंब जेवत असतानाच तलवारीचे घाव घातल्याने घरात रक्ताचा सडाच पसरला होता. टेंबलाई उड्डाणपुलाशेजारी असलेल्या बीएसएनएल टॉवरसमोर असलेल्या झोपडपट्टी परिसरात ही घटना घडली.
करणी करत असल्याने केला खून
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी (16 मे) रात्री नऊच्या सुमारास मुलतानी कुटुंबीय एकत्रित जेवण्यास बसले होते. हल्लेखोर निखिल आणि मुलतानी कुटुंबे झोपडपट्टी परिसरातील एकाच बोळात राहतात. मुलतानी कुटुंब त्यांच्या घराच्या बाहेरच्या खोलीत आझाद, पत्नी रेहाना, सून आयेशा, अफसाना आणि लहान मुलगा असे एकत्रित जेवत असताना निखिल तलवारीसह घरात घुसला.
निखिलने जेवत असलेल्या आझाद यांच्यावर वार केले. यावेळी आझाद यांच्यासमोर जेवायला बसलेली सून अफसानाने निखिलच्या अंगावर धाव घेत प्रतिकार केला. यामध्ये ती सुद्धा जखमी झाली. निखिलने आझाद यांच्यावर सात-आठ वार केले. हल्ल्यावेळी आरडाओरडा झाल्यानंतर शेजारील लोक धावून आले. त्यावेळी निखिल तलवारीसह निघून गेला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आझाद यांना तातडीने ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. मात्र, आझाद यांचा मृत्यू झाला होता. सीपीआरमध्ये आझाद यांचा मुलगा तौसिफने निखिलने खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. राजारामपुरी पोलीस सीपीआरमध्ये पोहोचले. दरम्यान, खून करुन घरातून निघून गेलेला निखिल राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाला. आझाद करणी करत असल्याने खून केल्याची कबुली त्याने दिली. निखिल हा टेम्पोचालक आहे.
मेंढपाळाचा कुऱ्हाडीने घाव घालून खून
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मेंढपाळाच्या खुनाचा उलघडा झाला आहे. पगार न दिल्याने दोघा कामगारांनी कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना घडली. मारुती मायाप्पा धनगर (वय 28 वर्षे) असे मयत मेंढपाळाचे नाव आहे. कागल पोलिसांनी संदीप दादासो माळी (वय 36 वर्षे, रा. नांदणी ता. शिरोळ जि. कोल्हापूर) आणि रवीकिरण चैनया (रा. बेळगाव) यांना अटक केली आहे. कामाचा पगार न दिल्याने दोघांनी कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. मयत मारुतीचा 12 मे रोजी निर्घृण खून झाला होता. मारुतीकडे संशयित आरोपी संदीप आणि रवीकिरण कामगार होते. मात्र या दोघांचा पगार देण्यात आला नव्हता. 12 मे रोजी मारुतीच्या बकऱ्यांचा कागल तालुक्यातील बानगेत तळ बसवण्यात आला होता. या तळावर पगारावरुन तिघांमध्ये जोरदार वादावादी झाली. या वादातून कुऱ्हाडीने घाव घालून मारुतीचा निर्घृण खून करण्यात आला. झोपेत असताना दोघांनी वार करुन मृतदेह ऊसात टाकून दिला होता.