कोल्हापूर : राजेंद्रनगर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा पडताच कारवाईच्या भीतीपोटी तरुणांनी तिसर्या मजल्यावरून उडी टाकली. यामध्ये साहिल मायकल मिणेकर-रजपूत (वय 26) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला; तर अन्य तिघे जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, जखमींना सुरुवातीला सीपीआर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी व नातेवाईकांनी गर्दी केली होती. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राजेंद्रनगर येथे एका इमारतीत गेल्या काही दिवसांपासून जुगार अड्डा सुरू होता. त्याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांना पाहताच पैसे व साहित्य जागेवरच टाकून जुगार खेळणार्यांची पळापळ झाली. यावेळी पोलिसांना चुकवण्यासाठी दोन तरुणांनी तिसर्या मजल्यावरून उड्या टाकल्या. त्यावेळी साहिल गटारीच्या काठावर पडल्याने गंभीर जखमी झाला. यावेळी दत्तात्रय देवकुळे हा तरुणही गंभीर जखमी झाला. साहिलच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने सुरुवातीला राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला.
साहिल व दत्तात्रय या दोघांना तातडीने सीपीआर रुग्णालयात उपचारांसाठी आणण्यात आले. मात्र, साहिल याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. साहिल याचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या मित्र व नातेवाईकांनी आक्रोश केला; तर गंभीर जखमी झालेल्या दत्तात्रयला पुढील उपचारांसाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये आणखी दोन तरुण किरकोळ जखमी झाले असून, त्यांनाही खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची सीपीआर पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. विच्छेदनसाठी साहिलचा मृतदेह शवविच्छेदनगृहात नेताच येथेही मोठी गर्दी झाली होती. शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकारीही सीपीआर हॉस्पिटल तसेच घटनास्थळी पोहोचले.
सीपीआरमध्ये तणाव
परिसरातील नागरिक व तरुणांच्या नातेवाईकांनी सीपीआर हॉस्पिटलकडे धाव घेतली. त्यामुळे सीपीआर परिसरात मोठी गर्दी होती. यामुळे तणाव निर्माण झाल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
Belgaum Varta Belgaum Varta