Thursday , November 21 2024
Breaking News

कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू

Spread the love

 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांमधील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाकडून बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. आज (5 जुलै) सकाळीपासून जिल्ह्यात बंदी आदेश लागू झाला असून 19 जुलैपर्यंत हा बंदी आदेश लागू असेल. त्यामुळे कलम 37 (3) अन्वये जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमणेस, मिरवणुका काढणे व सभा घेणे, याला बंदी असेल.
अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी बंदी आदेश काढले
मागील काही महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सोशल मीडियात आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यामुळे परिस्थिती चिघळल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून दोन गटामध्ये तेढ निर्माण झाला होता. कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून शाहुवाडी, शाहुपुरी, लक्ष्मीपुरी, करवीर, भुदरगड, वडगाव, हातकणंगले आणि शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडल्या आहेत. त्यानुसार पोलीस ठाणे अंतर्गत दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो, यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) नुसार अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी बंदी आदेश काढले आहेत.

जिल्ह्यात कोणत्या बाबींना बंदी असेल?

आदेशामध्ये कलम 37 (1) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदूका, सुऱ्या, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. दगड किंवा इतर शस्त्रात्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन याला बंदी असेल.
तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे. ज्यामुळे सभ्यता अथवा नितिमत्ता यास धक्का पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा जनतेत प्रसार करणे यालाही बंदी असेल.

About Belgaum Varta

Check Also

मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदार जनजागृतीला गती द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांच्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा कोल्हापूर (जिमाका): मतदानासाठी केवळ आठवडा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *