कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून सर्वदूर सुरु असलेल्या पावसाने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने पंचगंगा नदीने आज (24 जुलै) पहाटेच्या सुमारास इशारा पातळी गाठली. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फुट असून धोका पातळी 43 फूट आहे. कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यावर आज (24 जुलै) सकाळी दहा वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फूट 6 इंच इतकी झाली आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास आजच नदी धोका पातळी सुद्धा गाठण्याची शक्यता आहे.
पुरबाधित गावांसह क्षेत्रात स्थलांतर सुरु
पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढू लागल्याने नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. महापुराच्या कटू स्मृती अजूनही विस्मृतीत गेल्या नसल्याने प्रशासनाकडून पंचगंगा इशारा पातळीकडे जाऊ सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्वाधिक फटका बसणाऱ्या करवीर तालुक्यातील आंबेवाडी आणि चिखलीमध्ये स्थलांतर सुरु करण्यात आले आहे. तसेच कोल्हापूर शहरातील पूरबाधित भागांमध्येही स्थलांतर सुरु करण्यात आले आहे. शहरातील पुरबाधित भाग असलेल्या तावडे हाॅटेल परिसरातील कुंटुंबाचे मनपा प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील 83 बंधारे पाण्याखाली
दरम्यान, जिल्ह्यात सर्वदूर सुरु असलेल्या दमदार पावसाने विविध नद्यांवरील कोल्हापूर पद्धतीचे 83 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे थेट संपर्क तुटल्याने वाहतूक अन्य मार्गाने सुरु आहे. गगनबावडा तालुक्यातील लोंघे, मांडुकली येथे पाणी आल्यामुळे या मार्गावरील गोवा, पणजी, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकणातील वाहतूक बंद झाली आहे. फोंडा घाटमार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे. जिल्ह्यातील 24 पैकी 15 राज्य मार्ग आणि 122 पैकी 51 प्रमुख जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. या सर्व मार्गांवर वाहतूक बंद आहे. या मार्गावरून गावांना जोडणारे सुमारे चारशेहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. मात्र, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील 80 जनावरे आणि 125 लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.