कोल्हापूर : शिरढोण (ता. शिरोळ) येथील माळभागावरील जनावरांच्या गोट्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दर्शन कल्लाप्पा मोरडे व उदय कल्लाप्पा मोरडे या शेतकऱ्यांची २ दुभती जनावरांसह ४ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. यात सुमारे दीड लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली.
येथील माळभागावर मोरडे यांचा राहत्या घराजवळ जनावरांचा गोठा आहे. शनिवारी रात्री एकच्या सुमारास गोठ्यात असलेल्या विजेच्या तारांचा शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. गोठ्यात दोन दुभती जनावरे, तीन रेडकू होते. जनावरे बांधलेली असल्याने एका म्हशीचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर तीन जनावरे गंभीर भाजलेल्या अवस्थेत दोरी तोडून रस्त्यावर आली. जनावरांच्या ओरडण्याच्या आवाजाने मोरडे यांच्यासह नागरिक झोपेतून जागे झाले. त्यांनी पाणी मारुन आग आटोक्यात आणली. रात्री शासकीय पशुवैद्यकीय पर्यवेक्षक डॉ. सम्मेद पाटील, डॉ. ए. के. गावडे, डॉ. भाऊसो सासणे यांनी जनावरांवर औषधोपचार केले. मात्र, गंभीर भाजल्याने मृत्यूमुखी पडली. या घटनेवर नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे.