कोल्हापूर : शहरातील टाकळा चौकातील टोकियो कॅसल कॅफेवर कोल्हापूर पोलिसांच्या निर्भया पथकाने छापेमारी केली असून या ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या सहा जोडप्यांवर कारवाई केली. या कॅफेमध्ये आत छुपी खोली करून त्यात बेड देखील असल्याचं निर्भया पथकाच्या निदर्शनाला आलं. निर्भया पथकाच्या कारवाईने कॅफे मालकांचे धाबे दणाणले आहेत.
अनेकदा नोटिसा बजावून, कारवाई करूनही कोल्हापुरातील कॅफे चालकांची मनमानी सुरूच असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आज कोल्हापूरचे निर्भया पथक ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून आलं. टोकियो कॅसल कॅफे अश्लील चाळे चालतात याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर मंगळवारी दुपारच्या सुमारास निर्भया पथकाने कोल्हापूर शहरातील टाकाळा चौकातील टोकियो कॅसल कॅफेवर छापेमारी केली. या कॅफेत अश्लील कृत्य करत असताना तरुण-तरुणी आढळले.
या आधीही कारवाई
या आधीही कोल्हापुरातील अनेक कॅफेवर निर्भया पथकाने छापेमारी केली होती. कॉलेजच्या नावाखाील अंधाऱ्या खोलीत अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांवर आणि कॅफे मालकांवर त्यावेळी कारवाई करण्यात आली होती. पथकाने शहरातील मिरजकर तिकटी, उमा टॉकीज चौक, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर येथे छापेमारी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कॅफेवर छापेमारी करत पोलिसांनी सहा जोडप्यांना ताब्यात घेतलं आहे आणि कॅफे मालकावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
शाळा, कॉलेजजवळ घुटमळणाऱ्या टोळक्यांवर कारवाईचा बडगा
दरम्यान, शाळा, महाविद्यालय परिसरात विनाकारण घुटमळणारे तरुण, बसस्टॉप, शाळेच्या मार्गांवर थांबणारी तरुणांची टोळकी, भरधाव वेगाने जाणारे दुचाकीस्वार, बसस्टॉपवर गोंधळ घालणाऱ्या हुल्लडबाजांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाया करण्याच्या सूचना अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी निर्भया पथकांना दिल्या आहेत. त्यांनी शाळा, कॉलेजच्या वेळेत गर्दीच्या ठिकाणी गस्त घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विद्यार्थिनींच्या तक्रार पेटीची तातडीने दखल घ्या
जयश्री देसाई यांनी यापूर्वी महावीर कॉलेज, शहाजी कॉलेज, गोखले कॉलेज आणि कॉमर्स कॉलेजच्या आवारात जाऊन विनाकारण घुटमळणाऱ्या तरुणांना समज दिली होती. पोलिस आल्याचे पाहून अनेक तरुणांनी पळ काढला होता. हुल्लडबाज तरुणांबद्दल निर्भयपणे तक्रारी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी काही महाविद्यालयातील प्रशासनाशी चर्चा करून विद्यार्थिनींसाठी ठेवलेल्या तक्रार पेटीतील तक्रारींची वेळीच दखल घेण्याच्या सूचना दिल्या.