मान्सूनपूर्व कामांची आढावा बैठक संपन्न
कोल्हापूर (जिमाका) : येत्या पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मान्सूनपूर्व कामे मे अखेर पर्यंत पूर्ण करा. तसेच पुरामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी “ॲक्शन प्लॅन” तयार ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
मान्सूनपूर्व कामांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रकल्प संचालक वसंत पंधरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, पंचगंगा, कृष्णा, वारणा नदीच्या पुरामुळे अथवा अतिवृष्टीमुळे बाधित होणाऱ्या गावांची यादी करा. बाधित होणाऱ्या गावांतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी “ॲक्शन प्लॅन” तयार करा. पुरामुळे जिवीत, वित्त हानी होवू नये यासाठी सूक्ष्म नियोजन करा. पुराच्या पाण्यामुळे बंद होणाऱ्या रस्त्यांसाठी पर्यायी मार्ग तयार ठेवा. पावसाळ्यात ये – जा करताना नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्ह्यातील रस्ते, पूल यांच्या अपुऱ्या कामांची यादी करुन डागडुजी व दुरुस्तीची कामे मे अखेर पूर्ण करा. रस्त्यांची कामे सुरु असणाऱ्या आणि मार्ग वळवण्यात आलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावून घ्या. जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची पाहणी करुन डागडूजी करुन घ्या. धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीस पाठवा. प्रांत व तहसीलदारांनी जिल्ह्यातील अपूर्ण कामांची यादी करुन ती पूर्ण होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित विभागांकडे पाठपुरावा करावा. वादळ, वारा, पावसामुळे विद्युतवाहिन्या, रोहित्रे बाधित होवू नयेत तसेच वीजपुरवठा खंडित होवू नये, यासाठी त्यांची देखभाल- दुरुस्ती करुन घ्या.
संबंधित सर्व विभागांचे नियंत्रण कक्ष 1 जून रोजी सुरु होतील यासाठी योग्य नियोजन करा. या कक्षांचे दुरध्वनी व हेल्पलाईन क्रमांक अद्ययावत करा. या कक्षासाठी लागणारी साधनसामुग्री तयार ठेवा. ही साधनसामुग्री सुस्थितीत असल्याची खात्री करा. तसेच मनुष्यबळ तयार ठेवा.
जिल्ह्यात रस्ता खचणे, दरड कोसळणे व भूस्खलनाचा धोका असणाऱ्या गावांची यादी करा, अशा गावांना भेटी देवून सद्यस्थितीची माहिती घ्या. मान्सून कालावधीत स्थलांतर करावे लागणाऱ्या संभाव्य नागरिकांची व जनावरांची यादी अद्ययावत करा. आवश्यक त्या उपाययोजना मान्सून पूर्वी करा. पुराच्या पाण्यातून नागरिक प्रवास करणार नाहीत याची दक्षता घ्या. अग्नीशमन दलाच्या गाड्या तयार ठेवा. मान्सून कालावधीत कार्यरत अधिकारी, कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, सरपंच, तलाठी यांची नावे, नंबर आदी अद्ययावत माहिती तयार ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री येडगे यांनी दिल्या.
प्रसाद संकपाळ यांनी जिल्ह्याची तर सर्व विभाग प्रमुखांनी त्या त्या विभागांच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.