कोल्हापूर : कागल तालुक्यातील आनूर – बस्तवडे बंधाऱ्यांमध्ये बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून एकाचा शोध सुरु आहे. जत्रेनिंमित्त हे सर्वजण जमले होते. या घटनेने कागल तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
या घटनेमध्ये जितेंद्र विलास लोकरे (३६, मुरगुड), त्याची बहीण रेश्मा दिलीप येळमल्ले (३४, अथणी, कर्नाटक), मामाची मुलगी सविता अमर कांबळे (२७, रूकडी, हातकणंगले ) यांचा मृत्यू झाला आहे. तर भाचा हर्ष दिलीप येळमल्ले (१७, अथणी) याचा शोध घेतला जात आहे.
कडक उन्हापासून वाचण्यासाठी दुपारीही नदीवर मोठी गर्दी झालेली असते. तसेच सध्या खेडोपाड्यांमध्ये जत्रा, यात्रा सुरू आहेत. या निमित्ताने पाहुण्यांची वर्दळ वाढली आहे. पोहण्याबरोबरच कपडे धुण्यासाठीही नदीकडे राबता वाढला आहे. यामुळे अगदी सायंकाळपर्यंत नदी, तलाव येथे लोकांची गर्दी वाढलेली दिसून येते. नदीत सुरक्षित पोहण्याकडे लक्ष देण्याची गरज असली तरी त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक दुर्घटना घडत असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात यावर्षीच्या उन्हाळ्यात अशा प्रकारच्या अनेक दुर्घटना घडल्या आहेत. अशीच आणखी एक घटना कागल तालुक्यात घडली.
दूधगंगा नदीच्या बस्तवडे बंधाऱ्याजवळ नदीत पोहण्यासाठी आज दुपारी काहीजण नदीत उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेजण वाहून गेले. त्यापैकी तिघांना वाचवण्यात यश आले आहे. घटनास्थळी बचाव पथक पोहोचले आहे. ही माहिती समजताच परिसरातील हजारो लोकांनी एकच गर्दी केली.
असे झाले बचावकार्य
याबाबत बचाव पथकातील बस्तवडे येथील प्रमोद पाटील यांनी सांगितले की, आम्ही नदीवर मासे पकडण्यासाठी गेलो होतो. तेव्हा पोहण्यासाठी, कपडे धुण्यासाठी काही लोक आले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील चौघेजण वाहून गेले. आरडाओरडा ऐकून आम्ही मदतीसाठी धावलो. नदीत उडी घेऊन त्यातील तिघांना काही अंतरावर जाऊन काढले. एकजण बराच दूर गेल्याने हाती लागू शकला नाही.
पालकमंत्री संपर्कात
दुपारी या दुर्घटनेची माहिती आनूर व बस्तवडे या गावांमधील कार्यकर्त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिली. स्पेनमध्ये असलेल्या मुश्रीफ यांनी तातडीने जिल्हाधिकारी अमोल येडगे व तहसीलदार अमर वाकडे यांच्याशी संपर्क साधून तातडीने आपत्ती व्यवस्थापनाच्या बचाव पथकास नदीकडे पाठवण्याच्या सूचना केल्या. तसेच, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.