शंकराचार्य पीठाचे पुरस्कार वितरण
कोल्हापूर : देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती महत्त्वाची आहे, असे आशीर्वचन स्वामी विद्यानृसिंह भारती यांनी आज केले. येथील शंकराचार्य पीठामध्ये आद्य शंकराचार्यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन स्वामींच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावेळी स्वामीजी बोलत होते.
ते म्हणाले, देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती या दोन्हींचा समन्वय साधण्यासाठी धर्म सहकार्य करीत असतो आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी परंपरा आणि धर्माधिष्ठित कर्माची सांगड घालावी लागते. ज्यामुळे धर्म आणि राष्ट्र यांचे अथ्युत्थान होते.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा स्वामींच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये वैदिक पुरस्कार राघव रामदासी, पुणे, सांस्कृतिक पुरस्कार गोविंद शास्त्री जोशी, सातारा, स्थानिक वैदिक पुरस्कार संदीप काजरेकर, कोल्हापूर, सामाजिक गौरव संभाजी ऊर्फ बंडा साळुंखे, कोल्हापूर, महिला कीर्तनकार अस्मिता अरुण देशपांडे, डोंबिवली, होतकरू विद्यार्थी वाचस्पती कुलकर्णी, परभणी, श्रीवल्लभ गुरुप्रसाद पुजारी, नृसिंहवाडी, उत्कृष्ट शासकीय कर्मचारी डी. वाय. पाटील, खेबवडे आणि विशेष पुरस्काराने सौ. अनघा महेश कुलकर्णी, सांगली यांना गौरवण्यात आले. याचबरोबर महेंद्र इनामदार, प्रमोदशास्त्री कुलकर्णी यांचाही सत्कार स्वामींच्या हस्ते करण्यात आला.
स्वामींच्या हस्ते ज्ञान या पीठाच्या त्रैमासिकाचे प्रकाशनही करण्यात आले. प्रसाद चिकसकर, धनंजय मालू यांच्यासह मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते. स्वागत अध्यक्ष सुरेश कुलकर्णी यांनी केले. सचिव शिवस्वरूप भेंडे यांनी प्रास्ताविकात पीठातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन नंदकुमार मराठे आणि प्रमोदशास्त्री कुलकर्णी यांनी केले. रामकृष्ण देशपांडे यांनी आभार मानले.
दरम्यान, उद्या (गुरुवारी) पालखी प्रदक्षिणा आणि महाप्रसाद होऊन उत्सवाची सांगता होईल.
Belgaum Varta Belgaum Varta