मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली आणि आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. बचाव कार्याची आवश्यकता वाटल्यास तिथे एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या पाठविण्यात याव्यात. आवश्यकता वाटल्यास सेनादलाची मदत घेण्यात यावी. त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.
मुख्यमंत्री श्री. शिंदे हे निती आयोगाच्या बैठकीसाठी सध्या दिल्ली येथे आहेत. बैठकीला जाण्यापूर्वी तेथूनच त्यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा करुन पूर परिस्थिती, पावसाची सद्य:स्थिती आणि मदत व बचाव कार्यासंदर्भात माहिती घेतली.
पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच काल धरणक्षेत्रात झालेला पाऊस लक्षात घेता पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रशासनाने सतर्क आणि ऑन फील्ड राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, निवारा केंद्रांमध्ये सर्व सुविधा पुरविणे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. जिल्ह्यामध्ये एनडीआरएफची दोन पथके तसेच भारतीय सेनेचे पथकही मदतीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर लक्ष ठेवावे. धरणांमधून होणारा विसर्ग लक्षात घेवून अलमट्टी धरण प्रशासनाशी संपर्कात राहून आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या. सर्वांनी सतर्क राहून लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.