Saturday , October 19 2024
Breaking News

जयश्री जाधवांचा मोठा विजय; कोल्हापुरात भाजपचा करेक्ट कार्यक्रम!

Spread the love

कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या अडिच वर्षांच्या कामगिरीची परिक्षा ठरलेल्या आणि दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव या 18,901 मतांनी विजयी झाल्या आहेत. कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात लढलेल्या गेलेल्या या निवडणुकीत ‘आण्णांच्या माघारी, आता आपली जबाबदारी’ ही टॅगलाईन खरी करत महाविकास आघाडीने एकत्रित येत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा मोठा पराभव केला आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आताषबाजी करत एकच जल्लोष केला.
या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. 12) चुरशीने 61.19 टक्के मतदान झाले होते. एकूण 2 लाख 91 हजार 978 मतदारांपैकी एक लाख 78 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज या निवडणुकीची मतमोजणी राजाराम तलाव परिसरातील शासकीय गोदामात झाली. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. 26 टेबलांवरती 26 फेर्‍यांत 357 केंद्रावरील मतमोजणी करण्यात आली. यात अगदी पोस्टल मतांच्या फेरीपासूनच घेतलेली मतांची आघाडी जाधव यांनी शेपटपर्यंत कायम ठेवत विजयावर शिक्कामोर्तब केले.
पालकमंत्री सतेज पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आणि आरोप-प्रत्यारोपांच्या तोफांनी राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष वेधून घेतलेल्या या निवडणुकीत जयश्री जाधव यांच्या विजयाने काँग्रेसने कोल्हापूर उत्तरचा गड आपल्याकडे राखत पालकमंत्री पाटील यांनी या कोल्हापुरवरील आपली पक्कड मजबूत असल्याचे दाखवून दिले. विशेषतः सतेज पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावडा परिसरातील मतदार काय करणार याविषयी उत्सुकता होती. पण या परिसराने सतेज पाटील यांनाच ‘हात’ दिल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले आहे.
भाजपच्या पराभवामुळे प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे नेतृत्त्व कोल्हापुरकरांनी पुन्हा एकदा नाकारल्याचे चित्र आहे. विकासापेक्षा वैयक्तिक टिकेला महत्त्व, त्यातून झडलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, रांगोळीवर ओतलेले पाणी, महिलांविषयी केलेले वादग्रस्त वक्तव्य, सभेवर झालेली दगडफेक असे सर्व मुद्दे भाजपच्या पराभवासाठी जबाबदार ठरल्याचे राजकीय पंडित सांगत आहेत. तर पालकमंत्री पाटील यांनी राबवलेली यंत्रणा, निवडणूक कोणतीही असो त्यात दिवसरात्र झोकून देण्याची त्यांची तयारी आणि अखेरच्या टप्प्यात सर्व आयुधांचा त्यांच्याकडून झालेला वापर याचा फायदा काँग्रेसला झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.

About Belgaum Varta

Check Also

बाबा सिद्दीकींच्या हत्येचा वेगळा अँगल समोर; कोट्यवधींच्या एसआरए प्रकल्पाचा विरोध नडला

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बाबा सिद्दीकींच्या हत्येचे नवनवे कंगोरे आणि नवनवे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *