खानापूर : गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत असलेली शेतकऱ्यांची बिले 15 दिवसात देण्यात यावी अन्यथा लैला शुगर्स समोर शेतकरी बांधवांसह आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने देण्यात आला आहे.
खानापूर तालुका युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी लैला शुगर्स कारखान्यावर धडक देत कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदानंद पाटील व इतर अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला तसेच 15 दिवसात शेतकऱ्यांची थकीत बिले देण्याची मागणी केली तसेच याबाबतचे निवेदन देण्यात आले.
यावेळी ज्या शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केला. त्या शेतकऱ्यांची ऊसाच्या बिलांची 15 जानेवारी 2021 पूर्तता करण्यात आली आहे. पण त्यानंतर ज्या शेतकऱ्यानी कारखान्याला ऊस पुरविला त्यांचे बिल थकीत असल्याने कोरोना महामारीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. याची दखल घेऊन उर्वरित ऊस बिल लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 15 दिवसांच्या आत जमा करावे अन्यथा युवा समितीतर्फे शेतकरी बांधवांसोबत कारखान्याच्या गेट समोर आंदोलन सुरू करण्यात येईल याची कारखाना प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी केली.
यावेळी उपस्थित खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटिल, सचिव सदानंद पाटील, हलगा ग्राम पंचायत सदस्य रणजित पाटील, राजु कुंभार, विनायक सावंत, किशोर हेब्बाळळकर, भुपाल पाटील, परशराम गोरे, अनंत झुंजवाडकर, राहूल पाटील, ज्ञानेश्वर सनदी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी लॉकडाऊनमुळे साखर नेण्यास अडचण निर्माण होत आहेत त्यामुळे शेतकर्यांची बिले देण्यास अडचण निर्माण झाली असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर बिले मिळावीत यासाठी कारखाना प्रशासन प्रयत्नशील आहे. तसेच पुढील वर्षापासून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे. मात्र पंधरा दिवसात बिले न दिल्यास आंदोलन करण्याचा निर्धार समितीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.