पुणे : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीची राज्यव्यापी नियोजन बैठक पुणे येथे संपन्न झाली. या बैठकीला राज्यभरातून शिवप्रेमी व जिल्हा प्रमुख मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या बैठकीला युवराज छत्रपती संभाजीराजे यांचेसह युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती तसेच युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांनी मार्गदर्शन केले.
छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले की, गेली दोन वर्षे कोरोना परिस्थिती मुळे शिवभक्तांना रायगडावर येता आलेले नाही त्यामुळे यावर्षीचा शिवराज्याभिषेक महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करणेत येणार आहे. शिवरायांच्या विचाराचा जागर जगभर पोहचवला जाणार आहे. या वर्षी पाच ते सहा लाख शिवभक्त रायगडावर येतील हे गृहीत धरून नियोजन करण्यात येत आहे.
युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या औत्सुक्याने आणि आदराने जगभर पाहिला जातो. या कार्यक्रमाची ऐतिहासिक मूल्य पाहता हा सोहळा शिस्तबद्ध झाला पाहिजे याची सर्वानी काळजी घ्यावी. प्रदूषण मुक्त व पर्यावरण पूरक असा सोहळा पार पाडण्यासाठी सर्वांनी कटीबध्द रहावे.
युवराज कुमार शहाजीराजे हा संपूर्ण सोहळा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर होईल यासाठी प्रयत्नशील रहाणार आहेत.
यानिमित्ताने अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती नियोजनास लागली असून गडावर पाच ते सहा लाख शिवभक्तांचे अन्नछत्र उभारणेत येणार आहे. गडावर राजसदर फुलांनी सजवण्यात येणार असून भवनी पेठ, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर आणि शिवसमाधी विद्युत रोषनाईने उजळून निघणार आहे.
गडावर होणार्या संभाव्य गर्दीचा विचार करुन गडावर जाण्यासाठी व उतरण्यासाठी एकेरी मार्ग करणेत येणार आहे. रोपवेसाठी दिव्यांग आणि वृद्धांना प्राधान्य देण्यात आले असून शिवभक्तांनी पायी गडावर येण्याचे अवाहन करणेत आले आहे.
गडावरील तलावांची स्वच्छता केल्याने मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. आरोग्य व्यवस्थेसाठी जिल्हा प्रशासनामार्फत नियंत्रण कक्ष उभारणेत येणार आहेत.
शिवप्रेमींची राहण्याची सोय व्हावी म्हणून तात्पुरती तंबू उभारणे, गडस्वछतेसाठी एक हजार स्वयंसेवक असणार आहेत.
रायगडावरील प्रत्येक ऐतिहासिक क्षण टिपून तो जगभर पोहोचवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
दिनांक 5 जून रोजी..
1) युवराज संभाजीराजे आणि शहाजीराजे पायी गड चढणार असून होळीच्या माळावर शिवकालीन युद्धकलेचे सादरीकरण होणार आहे.
2) रायगड प्राधिकरणाच्या आत्तापर्यंतच्या कार्याचे सादरीकरण.
3) जागर शाहिरांचा, स्वराज्याच्या इतिहासाचा हा कार्यक्रम होईल.
दिनांक 6 जून…
1) सकाळी ध्वजपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल.
2) मुख्य शिवराज्याभिषेक कार्यक्रम युवराज संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांचे शुभहस्ते, दरबार पुरोहितांच्या मंत्र घोषात, सुवर्ण मुद्रा अभिषेक करुन होईल.
3) शिवरायांच्या पालखीचे नगर प्रदक्षिणा कार्यक्रमाने सांगता होईल.
बैठकीचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, स्वागत विराज तावरे यांनी केले. बैठकीस समितीचे अतुल चव्हाण, धनंजय जाधव, विश्वास काशिद(पुणे), आप्पासाहेब कुडेकर, डॉ. गजानन देशमुख, शुभम आहिरे (औरंगाबाद), गंगाधर काळकुटे(बीड), गजानन देशमुख (अमरावती), विष्णू इंगळे, हनुमंत काकडे (उस्मानाबाद) महेश शिंदे (तुळजापूर), पंकज जायले (अकोला), रमेश पाळेकर (लोणावळा) प्रशांत दरेकर (रायगड) हेमंत साळोखे, संजय पवार, अमर पाटील, उदय घोरपडे, विश्वास निंबाळकर (कोल्हापूर) तसेच विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta