Saturday , July 13 2024
Breaking News

भाजपची खेळी यशस्वी; धनंजय महाडिकांचा विजय, संजय पवार पराभूत

Spread the love

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन मल्ल मैदानात होते. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. भाजपने धनंजय महाडिकांच्या रुपाने सहावा उमेदवार रिंगणात उतरवल्याची खेळी यशस्वी झाली असून त्यांच्या विजयाने महाविकास आघाडी, खासकरून शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिकांना महाविकास आघाडीचे काही मतं मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे भाजपने शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवला आहे.

दरम्यान, भाजपच्या धनंजय महाडिकांचा हा विजय आणि शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव हा महाविकास आघाडीच्या, खासकरून शिवसेनेच्या जिव्हारी लागणारा आहे. सहाव्या जागेसाठी मतदान करताना महाविकास आघाडीची सहा मतं फुटल्याचं स्पष्ट झालं आहे.

‘निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती’ असं देवेंद्र फडणवीसांनी महाडिकांच्या विजयानंतर ट्वीट केलं आहे. सुरुवातीपासून शिवसेनेच्या संजय पवारांचे पारडे जड असतानाही शेवटी भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. यामध्ये देवेंद्र फडणीसांनी महाविकास आघाडीकडे शरद पवार यांच्यासारखा दिग्गज समोर असतानाही अचूक स्ट्रॅटेजी आखली आणि विजय खेचून आणला.

आता विधानपरिषदेकडे लक्ष

राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये तिसरा उमेदवार निवडून आणताना भाजपने महाविकास आघाडीची मतं फोडली आहेत. त्यामुळे आता दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानपरिषदेसाठी भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. विधानपरिषदेची निवडणूकही गुप्त मतदानाने होणार असल्याने महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.

About Belgaum Varta

Check Also

वसंत मोरे यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; शिवसेनेत प्रवेश करणार!

Spread the love  मुंबई : पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *