बेळगाव : हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी झालेल्या वक्तव्यावरून उठलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर आमदार बेनके यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. बेळगाव शहरातील फोर्ट रोड येथे भाजप प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्या प्रतिमेला फाशी देण्याचा प्रतिकात्मक प्रकार घडला होता.
काही समाजकंटकांकडून हा प्रकार घडला होता, त्यामुळे शहराचे वातावरण बिघडू नये यासाठी आमदार अनिल बेनके यांनी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोर्लिंगय्या यांची भेट घेऊन चर्चा केली.
आमदार बेनके यांनी अशा प्रकारच्या घटना बेळगाव परिसरात होऊ नयेत, बेळगाव हे शांतताप्रिय गाव आहे. इथे शांतता आहे. काही लोकांच्या आततायीपणामुळे जर बेळगावची शांतता भंग होईल तर ते बेळगावसाठी हानिकारक आहे.
यासाठी पोलीस कमिशनर यांना तुम्ही सतर्क राहून या पद्धतीच्या गोष्टी पुढे न होण्याची खबरदारी घ्यावी, त्याचबरोबर ज्या लोकांमुळे या पद्धतीच्या घटना घडत आहेत त्यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली.
पोलीस आयुक्तांनी आमदारांच्या सूचनांची गांभीर्याने दखल घेत आपण दोषींवर कारवाई करू आणि शहराची शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेऊ असे आश्वासन दिले.
