Sunday , July 26 2026
Breaking News

इंधन दरवाढ व खतांच्या किमतींविरोधात शेतकऱ्यांचा आवाज; दर नियंत्रणाची मागणी

Spread the love

 

बेळगाव : पेट्रोल, डिझेल आणि खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत असून केंद्र व राज्य सरकारने तातडीने इंधन आणि खतांचे दर नियंत्रणात आणावेत, अशी मागणी भारतीय कृषक समाजाचे जिल्हाध्यक्ष बसवराज मोकाशी यांनी केली.

बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवन येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. युद्धजन्य परिस्थितीचे कारण पुढे करून इंधन दरवाढ करण्यात आली असून त्याचा थेट परिणाम शेतीच्या खर्चावर होत असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे कृषी उत्पादनांना अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

“शेतीसाठी लागणारा खर्च सातत्याने वाढत असताना उत्पन्न घटत आहे. त्यामुळे सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करून नियंत्रणात ठेवावे,” अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी त्यांनी सातबारा उताऱ्यांच्या नव्या प्रक्रियेवरही नाराजी व्यक्त केली. पूर्वी कमी शुल्कात मिळणारे उतारे आता २०० ते ३०० रुपयांपर्यंत महाग झाले असून एका सर्व्हे नंबरमधील सर्व स्वतंत्र उतारे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

ग्रामीण भागातील ई-स्वत्तू उताऱ्यांच्या समस्येकडे लक्ष वेधताना, अनेक वर्षांपासून कर भरून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना मूळ मालकांकडून खरेदीपत्र आणण्यास सांगितले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून सर्वांना ई-स्वत्तू उतारे उपलब्ध करून द्यावेत, अशीही मागणी त्यांनी केली.

खत आणि बियाण्यांच्या टंचाईवर भाष्य करताना, दुकानदारांकडून शेतकऱ्यांना हवे ते खत न देता उपलब्ध असलेलेच खत खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. कृषी अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन खत व औषध विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणीही त्यांनी केली.

पेरणी हंगाम तोंडावर असताना प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेवटी बसवराज मोकाशी यांनी केली. पत्रकार परिषदेला भारतीय कृषक समाजाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *