
बेळगाव : कर्नाटकातील काँग्रेस राजकारणात पुन्हा एकदा नेतृत्वबदलाच्या चर्चांना उधाण आले असून, दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या बैठकींमुळे राज्यातील सत्तासमीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा जाण्याची शक्यता व्यक्त होत असताना, कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या (KPCC) अध्यक्षपदासाठी बेळगावचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावर कार्यरत असलेल्या नेत्याला पुढे मुख्यमंत्रीपद मिळण्याची परंपरा राहिली असल्याने, केपीसीसी अध्यक्षपदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सरकार स्थापन होताना पक्षश्रेष्ठींनी डी. के. शिवकुमार हे लोकसभा निवडणुकीपर्यंत प्रदेशाध्यक्ष राहतील, असे स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या समर्थक गटाकडून नेतृत्वबदलासाठी हालचाली सुरू झाल्याची चर्चा होती. तरीदेखील, सत्तांतराच्या मुद्यावर अंतिम निर्णय होईपर्यंत अध्यक्षपद सोडणार नसल्याची भूमिका शिवकुमार यांनी कायम ठेवली आहे.
दुसरीकडे, सतीश जारकीहोळी यांनी केपीसीसी अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्याचे बोलले जात आहे. आगामी २०२८ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आपली दावेदारीही सूचकपणे स्पष्ट केली असल्याचे मानले जाते.
राज्यातील विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी काँग्रेसकडून तीन ते चार उपमुख्यमंत्री पदांची निर्मिती करण्याचाही विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. लिंगायत, मुस्लिम, दलित आणि मागासवर्गीय समाजाला सत्तेत अधिक प्रतिनिधित्व देण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.
याशिवाय, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजकीय योगदानाची दखल घेत त्यांचे सुपुत्र व विधान परिषद सदस्य यतींद्र सिद्धरामय्या यांना मंत्रिमंडळात संधी देण्याबाबतही हायकमंड स्तरावर सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे समजते.
Belgaum Varta Belgaum Varta