राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची शरद पवारांकडे तक्रार
मुंबई : राज्यसभेतील सहाव्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला. या पराभवानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर हल्लाबोल केला. अपक्ष आमदारांनी शब्द फिरवल्यानं शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्याचं म्हणत राऊतांनी घोडेबाजाराचा आरोप केला. राऊतांनी केलेल्या आरोपांमुळे राष्ट्रवादीचे नेते नाराज झाल्याचं समजतं. अपक्षांवर आगपाखड करणार्या राऊतांची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवारांकडे तक्रार केली आहे.
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला. त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला. या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. अपक्षांची मतं फुटल्यानं शरद पवारांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केली. तर राष्ट्रवादीच्या आमदारांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पवारांकडे तक्रार केली. राऊतांच्या विधानांमुळे, आरोपांमुळे मविआमध्ये तणाव निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
फुटलेल्या आमदारांमुळे शिवसेनेच्या उमेदवाराचा निवडणुकीत पराभव झाल्याचं विधान राऊत यांनी केलं. देवेंद्र भुयार, शामसुंदर शिंदे, संजय मामा शिंदे या अपक्ष आमदारांची नावं घेत राऊत यांनी घोडेबाजाराचे आरोप केले. राऊतांच्या विधानांमुळे मविआला पाठिंबा देणार्या अपक्ष आमदारांमध्ये अविश्वास निर्माण होईल. अनेक आमदारांनी आताच त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही नाराजी मविआला परवडणारी नाही, असा सूर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आळवला.
Belgaum Varta Belgaum Varta