जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे सुधारित आदेश
कोल्हापूर (जिमाका): ज्या जिल्ह्यात दि. 30 जानेवारी रोजी 18 वर्षावरील 90 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस व 70 टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले असतील त्या जिल्ह्यांना दि. 8 व 9 जानेवारी 2022 रोजी जारी केलेल्या आदेशामधून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. राज्य शासनाने लसीकरण पूर्ण झालेल्या जिल्ह्यांची यादी दिली असून त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात दि. 9 जानेवारी रोजीच्या आदेशाद्वारे लागू केलेल्या निर्बंधांना खालील अटी व शर्तीस अधीन राहून दि. 3 फेब्रुवारी रोजी 12 वाजल्यापासून शिथिलता देण्यात येत असल्याचे सुधारित आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी निर्गमित केले आहेत.
अटी व शर्ती याप्रमाणे : दिनांक 9 जानेवारी रोजीच्या आदेशान्वये अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यासाठी रात्री 11 वा. ते पहाटे 5 वाजेपर्यंत घालण्यात आलेली बंदी शिथिल करुन दिवसा जे निर्बंध आहेत तेच रात्रीसुध्दा लागू राहतील.
स्पर्धात्मक खेळांसाठी बंदीस्त किंवा खुल्या ठिकाणी होणार्या व बैठक व्यवस्था असणार्या किंवा नसणार्या ठिकाणी आसन क्षमतेच्या 25 टक्के किंवा 200 व्यक्ती यापैकी जी संख्या कमी असेल त्यास परवानगी असेल.
जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे खालील अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधिन राहून खुली करण्यास परवानगी देण्यात येत आहे़.
पर्यटन स्थळाच्या सुरूवातीच्या ठिकाणी ((Entry Point) पर्यटकांकडून कोविड अनुरुप वर्तनाचे पालन होण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी पुरेशा कर्मचार्यांची नेमणूक करुन, तपासणी पथके नियुक्त करावीत.
पोलीस प्रशासनाने सर्व पर्यटन स्थळांच्या ठिकाणी शक्य तेथे कर्मचारी नेमावेत. तसेच पोलीसांचे फिरते पथक तैनात ठेवावे. या पथकाद्वारे स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने पर्यटकांकडून कोविड अनुरुप वर्तनाचे पालन होत असल्याबाबतची तपासणी करावी.
येणार्या प्रत्येक पर्यटकाचे थर्मल स्कॅनिंग करावे. थर्मल स्कॅनिंगमध्ये एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान मर्यादेपेक्षा जास्त अढळल्यास त्याला या ठिकाणी प्रवेश देण्यात येवू नये. येणार्या प्रत्येक पर्यटकाचे लसीकरण पूर्ण झाल्याची खात्री करावी. त्यासाठी त्याचे लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र तपासावे. कोविड अनुरुन वर्तनाचा भाग म्हणून पर्यटकांना तीन पदरी मास्क / एन95 मास्क लावण्याची सक्ती करावी. याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची राहील. तसेच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटकांकडून योग्य ते सामाजिक अंतर राखण्याबाबतची उपाययोजना स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी आणि पर्यटकांना कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करणार्या सूचना देण्यासाठी पुरेशा प्रमाणात सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली स्थापित करावी.
आठवड्याच्या शेवटी (weekend) व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटन स्थळावर होणार्या जादाच्या गर्दीसाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभाग यांनी योग्य नियोजन करावे. उदा. अतिरिक्त कर्मचारी वर्ग नेमणे, फिरती पथके वाढविणे, ठराविक अंतराने सूचनांचे प्रसारण करणे इत्यादी.
वरील सर्व अनुपालना विषयी सनियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित तहसिलदार यांची राहील.
जिल्ह्यातील आठवडी बाजार भरविताना खुल्या / मोकळ्या जागेत दोन विक्रेत्यांमध्ये पुरेसे अंतर ठेवून व कोविड 19 च्या अनुषंगाने देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या अटीस अधिन राहून परवानगी देण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी याची खात्री करावी.
जिल्ह्यात यात्रा व जत्रांचे आयोजन करताना दिनांक 9 जानेवारी रोजीच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे 50 व्यक्तींना फक्त पारंपारिक धार्मिक कार्यक्रम करण्यास परवानगी असेल. या ठिकाणी स्टॉल लावण्यास खुल्या/मोकळ्या जागेत दोन विक्रेत्यांमध्ये पुरेसे अंतर ठेवून व कोविड 19 च्या अनुषंगाने देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या अटीस अधिन राहून परवानगी देण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी याची खात्री करावी.
वरील आदेशाचे पालन न करणार्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.
Check Also
दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींच्या सुटकेविरोधातील दाभोलकर कुटुंबीयांच्या अपिलाला आक्षेप
Spread the love मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या …