संकेश्वर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमुळे गेल्या दोन-अडीच वर्षांत सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम ठप्प झाले होते. आता परत कार्यक्रम होताना दिसत आहेत. आजच्या पिढीतील मुलींना सांस्कृतिक कार्यक्रमाची ओळख करुन देण्यासाठी ‘उत्तरायण’ कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती सौ. मिनाक्षी ए. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
त्या पुढे म्हणाल्या, आमच्या एसडीव्हीएस शिक्षण संस्थेतर्फे उत्तरायण कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. पूर्वी मकर संक्रांत ते उत्तरायण दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम चालायचे. अलिकडे त्याचा विसर होताना दिसत आहे. आजच्या पिढीतील मुलींना उत्तरायण कार्यक्रमाचे महत्व समजावून सांगण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिलांचा ओटी भरणेचा कार्यक्रम, शाळेतील मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी पतंग उत्सव ठेवून घेण्यात आले आहे. सुवासिन महिलांची ओटी भरणेचा कार्यक्रम हे सौभाग्याचे संकेत समजले जाते.उत्तरायण काळात हा कार्यक्रम ठेवून घेण्याने समृद्धी होते. आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक चांगल्या रुढी परंपरा चालत आल्या आहेत. त्या पुढे चालवून नेण्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज आहे. मकर संक्रांतला पतंग उत्सव आयोजित करुन त्यातून ग्रामीण क्रिडेला प्रोत्साहन देण्याचे कार्य केले जाते. एसडीव्हीएस शिक्षण संस्थेतर्फे उत्तरायण कार्यक्रमात शालेय मुलां-मुलींसाठी आणि पालकांसाठी पतंग उत्सव ठेवून घेण्यात आले आहे. येथून पुढे दरवर्षी उत्तरायण कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बेळगांव नागरत्न फौंडेशनच्या स्वप्ना रामगोंडा नागरत्न, नगरसेविका सौ. शेवंता कब्बूरी, शोभा आर. पाटील, उषा रवदी, डॉ. शितल भिडे, गौरी अजण्णावर, शितल मुडशी, विजेता पेडणेकर, शोभा केस्ती आदी मान्यवर उपस्थित होत्या. उपस्थितांचे स्वागत प्राचार्या सर्वमंगला यरगट्टी यांनी केले. महिलांच्या ओटी भरणेचा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला एक हजार महिलांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमात शालेय मुलींनी भरतनाट्यम, विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाला एसडीव्हीएस शिक्षण संस्थेचे संचालक ॲड. आर. बी. पाटील, काशीनाथ शिरकोळी दयानंद केस्ती, प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. ए. पुजारी उपस्थित होते.