बंड केल्यानंतर शिवसेनेनं कारवाई करत एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या गटनेते पदावरुन उचलबांगडी करत शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. यावर आक्षेप घेत एकनाथ शिंदेंच गटनेते असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अनेक दावे-प्रतिदावे केले जात होते. अशातच आता शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभू यांना विधीमंडळानं मान्यता दिल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मान्यता दिल्याचंही सूत्रांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे आता शिंदे गटाला न्यायालयात दाद मागावी लागणार आहे. अशातच आता एकनाथ शिंदे आता कोर्टात धाव घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिंदे गटाला मोठा धक्का; अजय चौधरी, सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला मान्यता, कोर्टात धाव घेणार?
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शिवसेना नेत एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केला आणि शिवसेनेत वादळ आलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. एकीकडे सरकार टिकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये खलबतं सुरु आहेत. तर दुसरीकडे पक्ष वाचवण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरु झाली. अशातच यामागे भाजपचा हात असल्याचे आरोपही सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहेत. तब्बल चार दिवसांपासून सुरु असलेलं हे बंड आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे.