गुवाहाटी : राज्यातील राजकीय पेचप्रसंग जटील बनत चालला आहे. शिवसेनेतील बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना परत फिरण्याचे आवाहन केले आहे. आपण मुंबईत या. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. तुम्ही आजही मनाने शिवसेनेतच आहात, अशी भावनिक साद बंडखोरांना घातली. यावर आता शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून प्रश्न उपस्थित केला आहे. यावर मुख्यमंत्री ठाकरे काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआ सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय? असा सवाल शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.
दरम्यान, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो की, अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे की, आपण मुंबईत या. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. तुम्ही आजही मनाने शिवसेनेतच आहात, अशी भावनिक साद बंडखोरांना मुख्यंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घातली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे की, , तुम्ही गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्याबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. आपल्यातील बरेच जण संपर्कातही आहेत. त्यामुळेच तुम्ही आजही मनाने शिवसेनेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करत बंडखोर शिवसैनिकांना भावनिक साद घातली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख आणि तुमचा कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटते. तुम्ही मुंबईत येऊन माझ्यासमोर बसा, बोला आपण मार्ग काढू. शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल. कोणाच्याही कोणत्याही भूल-थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात बोललात तरच मार्ग निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.