Wednesday , December 10 2025
Breaking News

गाफील राहू नका, नवीन निवडणूक चिन्हासाठी तयार राहा; उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन

Spread the love

मुंबई : शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्य बाण’ वर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. बंडखोर गटाकडे शिवसेनेचे निवडणूक चिन्हं जाऊ नये आणि ते गेल्यानंतर काय करता येईल, त्याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना गाफिल न राहण्याचे आवाहन केले आहे. दुर्देवाने निवडणूक चिन्ह गोठवल्यास नवीन चिन्ह कमी कालावधीत घराघरात पोहचवण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेने 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यानंतर या कारवाईला शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. सुप्रीम कोर्टात येत्या 11 जुलै रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्याशिवाय, शिंदे गटाने शिवसेनेने विधीमंडळ गटनेते पदावर अजय चौधरी यांच्या केलेल्या नियुक्तीलाही आव्हान दिले आहे. यासह इतर याचिकांवरही सुप्रीम कोर्टात 11 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, याआधीच राज्यात सत्तांतर झाले असून एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर भाजपने नवीन विधानसभा अध्यक्षांची निवडदेखील केली. त्यामुळे शिवसेनेला मोठा शह मिळाला आहे.

विधीमंडळात या घडामोडी सुरू असताना बंडखोर गटाने आमचाच शिवसेना पक्ष खरा असल्याचे सांगत निवडणूक चिन्हावरही दावा करण्याचे संकेत दिले आहेत. एकनाथ शिंदे गटात ठाणे, नवी मुंबईतील बहुतांशी नगरसेवक सामिल झाले आहेत. तर, काही माजी लोकप्रतिनिधीदेखील शिंदे यांच्या गटाच्या मार्गावर आहेत. शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 12 खासदार शिंदे गटात सामिल होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर विधीमंडळातील लढाईसोबत शिवसेनेकडून कायदेशीर लढाई केली जात आहे. मुंबई, दिल्लीतील कायदेतज्ज्ञ, वकीलांसोबत शिवसेना नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. यामध्ये कायदेशीर डावपेचाची आखणी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. कायद्याच्या लढाईत अपयश आल्यास काय करता येईल, याचीही तयारी शिवसेनेने केली आहे. निवडणूक चिन्ह चिन्ह गोठवल्यास शिवसेनेला आगामी मुंबईसह राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा फटका बसणार आहे. शिवसेनेच्या मतदारांमध्ये संभ्रम राहू नये यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऐनवेळी आलेले निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत घेऊन जाण्याची तयारी करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *