नवी दिल्ली : आषाढी एकादशीनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करु, पावसाळी अधिवेशनाच्याआधी विस्तार होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.9) पत्रकार परिषदेत सांगितले. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिल्ली दौर्याबाबत माहिती दिली. या दौर्यामागे कोणताही राजकीय अजेंडा नाही, ही केवळ सदिच्छा भेट होती, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भेट घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
शिंदे पुढे म्हणाले की, राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको, अशी आमची भूमिका आहे. सध्या राज्यात पूरपरिस्थिती असल्याने पावसाळ्यानंतर निवडणुका घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा करणार आहे. तसेच ओबीसी आरक्षणाबाबत दिल्लीत तुषार मेहतांशी चर्चा केल्याचेही शिंदे यावेळी सांगितले. महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत युतीसाठी मते मागून निवडणूक लढवली होती. त्यामुळे आता राज्यात भाजप-सेना सरकार सत्तेवर आले आहे. महाराष्ट्रात स्थिर सरकार आले आहे. राज्यातील जनतेच्या मनात जे सरकार होते, ते सरकार सत्तेवर आल्यामुळे जनतेच्या इच्छेनुसार सरकार स्थापन झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta