नवी दिल्ली : ज्या शिवसेनेसाठी आयुष्याची 52 वर्षे मेहनत केली, त्याच शिवसेनेतून माझी हकालपट्टी झाली, असे म्हणत ढसाढसा रडणार्या रामदास कदम यांना शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. रामदास कदम आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळीकीवर बोट ठेवत आहेत. मात्र, विधानसभा निवडणूक हारल्यानंतर हेच रामदास कदम राष्ट्रवादी काँग्रेससोबत संधान साधू पाहत होते, असा आरोप शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला. ते मंगळवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी अरविंद सावंत यांनी रामदासभाईंना खडे बोल सुनावले. रामदास कदम यांनी स्वत:च आत्मपरीक्षण केले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून रामदास कदम अडीच वर्षांमध्ये एकदाही मातोश्रीवर फिरकले नाहीत. त्या दिवसापासून रामदास कदम यांनी एक अवाक्षरही काढलं नाही. पक्षात चुकीच्या गोष्टी सुरु असतील तर शिवसेनेचा नेता म्हणून त्यांनी बोलायला हवे होते. पण गेल्या अडीच वर्षांमध्ये ते एकदाही मातोश्रीवर आले नाहीत. ते इतक्या कुपमंडकू वृत्तीचे आहेत की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा अभिनंदन करण्यासाठीही रामदास कदम आले नव्हते. तेव्हा अडीच वर्षात त्यांनी मातोश्रीवर पाऊल का ठेवले नाही, हे त्यांना विचारा, असे अरविंद सावंत यांनी म्हटले.
आज पक्ष अडचणीत आला आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी तुम्हाला काय दिलं नाही? तुम्ही विधानसभा निवडणुकीत पडलात, लोकांनी तुम्हाला पराभूत केले. त्यानंतर तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे पुनर्वसनाचा आग्रह धरला. या काळात रामदास कदम यांचं राष्ट्रवादी काँग्रेसशी साटलोटं सुरु होतं. रामदास कदम यांच्याकडून वेगळे प्रयत्न सुरु होते. ही गोष्ट लक्षात येताच शिवसेनेने काळजी घेतली. त्यामुळेच खेडमधून पराभूत झालेल्या रामदास कदम यांना मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर पाठवण्यात आले. त्यावेळी शिवसैनिकाला डावलून रामदास कदम यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आमदार होऊनही, तुमचं समाधान झालं नाही का, असा सवाल अरविंद सावंत यांनी कदम यांना विचारला. यावर आता रामदास कदम काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.
’शरद पवार आणि अजित पवार यांनी शिवसेना फोडली’
तत्पूर्वी रामदास कदम यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. शरद पवार आणि अजित पवार यांनी शिवसेना फोडली. अजित पवार यांना प्रशासकीय कामाचा प्रचंड अनुभव आहे. त्याच जोरावर अजित पवार यांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला. तर शरद पवार यांनीही संधी साधून अनेकदा शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला होता.