Wednesday , December 10 2025
Breaking News

मनावर दगड ठेवून भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले : चंद्रकांत पाटील

Spread the love

 

मुंबई : “मनावर दगड ठेवून भाजपाचे केंद्रीय नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे आपल्याला अतिशय दुःख झाले.”, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (शनिवार) येथे केले. या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत.

भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी व कार्यसमितीच्या पनवेल येथे झालेल्या बैठकीचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केले. त्यावेळी महाराष्ट्र प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, सह सरचिटणीस शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राष्ट्रीय व प्रदेश स्तरावरील अनेक नेते बैठकीस उपस्थित होते.

या निर्णयामुळे आपल्या सर्वांना दु:ख झाले
“भाजपा व शिवसेना युतीला २०१९ मधील निवडणुकीत बहुमत मिळूनही शिवसेनेने विश्वासघात करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. करोना काळात जनतेचे खूप हाल झाले. सरकारविरोधात कोणी टिप्पणी केल्यास तुरुंगात डांबले गेले. राज्याची विकास गती मंदावली. गेल्या अडीच वर्षांतील चित्र पाहिल्यानंतर राज्यात सत्ता बदलण्याची गरज होती आणि तसा बदल झाला. हा बदल होत असताना योग्य संदेश जाईल आणि चांगल्या निर्णयांना स्थिरता देईल, असा एक नेता देण्याची गरज होती. त्यामुळे मनावर दगड ठेवून फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आपल्या सर्वांना दु:ख झाले. वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस होते. त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, असा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने दिला आणि तो फडणवीस यांनी मान्य केला.” असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार फडणवीस यांच्या त्यागाबद्दल सर्वांनी त्यांना उभे राहून अभिवादन केले.

पंकजा मुंडे समर्थकांना खडे बोल?
प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी फडणवीस यांच्याबद्दल गौरवोद्गार काढल्यावर पक्षनिर्णयाविरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले. राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कोणाचाही नामोल्लेख न करता पाटील म्हणाले, “फडणवीस यांनी त्याग केला. पण आपलीही काही जबाबदारी आहे. नगरपालिका किंवा कुठेही उमेदवारी मिळाली नाही की कार्यालय फोडायचे, रूसून बसायचे, हे योग्य नाही. सरकार आज आले, पण भाजपा पक्ष म्हणून मजबूत होता, आहे व राहील. पक्षाच्या नेत्यांवर श्रध्दा ठेवा. काहीजण ओक्साबोक्शी रडले. मनाचा मोठेपणा हे आपले वैशिष्ट्य आहे. मनाविरुध्द घडले तरी आपले दुःख विसरून कामाला लागा. संघटना मजबूत करा. नेत्यांनी आदेश देण्याची गरज नाही. त्यांची इच्छा पाहून निर्णय स्वीकारावा. नाहीतर मनाविरुध्द घडले की आपल्या समर्थकांना किंवा गटाला घेऊन जिल्हा परिषदेतून बाहेर पडायचे, असले प्रकार करू नयेत.” असे पाटील यांनी स्पष्ट केले.

भाजपाची सारवासारव
यानंतर ‘ ते ‘ प्रदेशाध्यक्षांचे मत नसून त्यावेळी घडलेल्या घडामोडी व प्रसंगाबाबत कार्यकर्त्यांच्या मनातील भावार्थ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला, असे स्पष्टीकरण भाजपातर्फे आमदार आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

भाजपा नेतृत्वाने मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्य मंत्री केले, असे वक्तव्य पाटील यांनी केल्यावर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. त्यानंतर शेलार यांनी पत्रकारपरिषदेत त्याबाबत स्पष्टीकरण केले. तसेच, पाटील यांच्या भाषणाची ध्वनिचित्रफीत भाजपाने समाजमाध्यमांवरून तातडीने काढून टाकली. ही ध्वनिचित्रफीत कशी व का बाहेर आली, हा आमचा अंतर्गत प्रश्न असून तो सोडविला जाईल, असेही शेलार यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *