मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचं (ईडी) पथक रविवारी (31 जुलै) सकाळी 7 वाजता संजय राऊत यांच्या मुंबई येथील घरी दाखल झालं. आज दिवसभरात राऊतांची पुन्हा चौकशी होईल. यात त्यांना पत्राचाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातील. याशिवाय घराची झडतीही घेतली जाण्याची शक्यता आहे.
ईडीच्या एकूण तीन पथकांकडून कारवाई होत आहे. दरम्यान, या प्रकरणी ईडीने आधीही संजय राऊत यांच्या अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई केली होती.
संजय राऊत यांच्या ईडी कार्यालयावर झालेल्या या कारवाईविरोधात आता शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. राऊतांवर राजकीय सुडापोटी कारवाई होत आहे, असा आरोप शिवसैनिक करत आहेत.
मुंबईतील 1 हजार 39 कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. यासंदर्भात ईडीनं कारवाई केली होती.
Belgaum Varta Belgaum Varta