मुंबई : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यामध्ये एकाही महिला आमदाराला स्थान न देण्यात आल्यामुळे शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे अनेकजण नाराज असल्याचेही समोर आले आहे. त्यातच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पंकजा मुंडे यांना स्थान मिळणार अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांची खदखद पुन्हा एकदा समोर आली. मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही, यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ’माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं नसेल.’ पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि महादेव जानकर दरवर्षी रक्षाबंधनाचा सण साजरा करतात. याही वर्षी पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर यांना राखी बांधली. अवघ्या देशभरात आज रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळतोय. राजकीय वर्तुळातही सर्वांनी हा सण अतिशय आनंदात साजरा केला.
महादेव जानकर यांना राखी बांधल्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, ’आम्ही दरवर्षी रक्षाबंधन साजरा करतो. आज रक्षाबंधनचा दिवस आहे, म्हणून राजकीय बोलणार नाही. सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. ओबीसीचे आरक्षण पुन्हा मिळवावे, अशी या सरकारकडून अपेक्षा आहे. कदाचित माझी पात्रता नसेल म्हणून मंत्रिपद दिलं नसेल. जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा मंत्रिपद देतील. यावर माझं काहीच म्हणणं नाही.’
Belgaum Varta Belgaum Varta