मुंबई : महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. खातेवाटपानंतरची ही पहिलीच बैठक असेल. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी विरोधी पक्षांचे प्रमुख नेतेही उपस्थित असतील.
17 ते 25 ऑगस्टपर्यंत चालणार अधिवेशन
पावसाळी अधिवेशन 17 ते 25 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी पावसाळी अधिवेशन हे 18 जुलै रोजी होईल असे घोषित करण्यात आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडामुळं महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे.
दरम्यान, 17 ते 25 ऑगस्ट या कालावधीत अधिवेशन होणार असून यामध्ये शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी दहीहंडी सुट्टी आणि दिनांक 20, 21 ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.