विधानभवनाबाहेर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांच्यात धक्काबुक्की
मुंबई : विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याने वातावरण तापलं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांनी एकमेकाला धक्काबुक्की केली. दरम्यान सत्ताधाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
आजचं कामकाज सुरु होण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांशी भिडले. विरोधकांकडून ‘५० खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके!’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. दरम्यान, सत्ताधारी पक्षाचे आमदार विधीमंडळाच्या पायऱ्यांवर उपस्थित असल्याने विरोधकांनी आमची जागा हायजॅक केल्याचा आरोप केला. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमदार अक्षरश: एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं चित्र होतं. यावेळी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्यात जोरदार वाद झाला.
“५० ओके एकदम ओके ही घोषणा त्यांच्या फार जिव्हारी लागली. ते नाराज झाले असल्यानेच आज त्यांच्यातील काही आमदार येथे आले असून, घोषणा देत आहेत. विधीमंडळात अशा गोष्टी घडत असतात. पण त्यांच्या वागण्यातून मनाला लागलं असल्याचं स्पष्ट दिसत आहे,” अशी प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.
शिंदे गटाचे भरत गोगावले यांचा इशारा
“आम्ही यांचा सगळा इतिहास बाहेर काढला. करोनाचा काळ, सिंचन घोटाळा, नवाब मलिक, अनिल परब यांची वस्तुस्थिती आम्ही मांडली. आमचं झाल्यानंतर पायऱ्या रिकाम्या केल्या असत्या. पण आम्ही बोलत असतानाच गोंधळ घालत लक्ष विचलित करायचं हा कोणता प्रकार आहे. आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का? आम्ही जशास तसं उत्तर दिलं आहे. त्यांनी आमचा नाद करायचा नाही. कारण आम्ही कोणाला पाय लावत नाही. चुकून पाय लागला तर आम्ही नमस्कार करु, पण कोणी आम्हाला पाय लावण्याचा प्रयत्न केला तर सोडणार नाही. अंगावर येईल त्याला शिंगावर घेऊ,” असा इशारा शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिला आहे. हा तर फक्त ट्रेलर होता, चित्रपट अजून बाकी आहे असंही ते म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta