मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊतांना आणखीन 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 19 सप्टेंबरपर्यंत संजय राऊतांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. याच प्रकरणी संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.
पत्राचाळ प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी ईडीने अटक केली होती. 8 दिवसांच्या ईडी कोठडीनंतर त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तिथे ईडीने त्यांच्या कोठडीची मागणी केली नाही, त्यामुळे त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती. आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचे जेवण आणि औषधे पुरवण्याची मुभा न्यायालयाने दिले होती. आज पुन्हा त्यांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यानच्या काळात त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही पत्राचाळ आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने समन्स बजावले होते. त्यांचीही चौकशी करण्यात आली. आज संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी संपली असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने पुन्हा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली असून 19 सप्टेंबरपर्यंत त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta