मुंबई : शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी 14 दिवसांनी वाढली आहे. संजय राऊत यांना 4 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. मुंबईतील गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत मागील 50 दिवसांपासून तुरुंगात आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर तसंच कोठडीबाबत आज एकत्रित सुनावणी पार पडली.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने चार दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं. 1039 कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारात राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची आज न्यायालयाने दखल घेतली. परंतु आम्हाला अद्याप आरोपपत्राची प्रत मिळालेली नाही, असं संजय राऊत यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितलं. यानंतर संजय राऊत यांना आरोपपत्राची प्रत देण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला दिले. कोर्टाच्या आदेशानंतर आज ही प्रत देऊ असं ईडीने सांगितलं. जोपर्यंत तुम्ही आरोपपत्र देत नाही, तोपर्यंत संजय राऊत यांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करत असल्याचं कोर्टाने म्हटलं.