नाशिक : मागील चार दशकांहून अधिक काळ आदिवासी, शेतमजूरांसह समाजातील वंचित घटकांसाठी आयुष्य वेचणारे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि विचारवंत कुमार शिराळकर यांचे रविवारी रात्री निधन झाले. नाशिकमधील कराड रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते 81 वर्षांचे होते. वर्ष 2019 पासून कर्करोगाने त्यांना ग्रासले होते. मात्र, मागील काही महिन्यात त्यांचा आजार बळावला. त्यांच्या निधनाने ध्येयवादी, तत्वनिष्ठ विचाराने वंचितांसाठी झटणाऱ्या एका समर्पित पर्वाची अखेर झाल्याची भावना व्यक्त होत आहे. आज सायंकाळी चार वाजता शहादा येथील मोडमधील कॉ. बी. टी. रणदिवे हायस्कूल प्रांगणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडणार आहेत.
1970 च्या दशकात आयआयटी मुंबईतून सुवर्णपदक प्राप्त केलेल्या कुमार शिराळकर यांनी नोकरीचा त्याग करून तत्कालीन धुळे जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील आदिवासींवर जमीनदारांकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आयुष्य झोकून दिले. अंबरसिंह महाराज यांच्या नेतृत्वातील लढ्यात ते सहभागी होते. आपल्या अनेक मध्यमवर्गीय, सुशिक्षित साथीदारांना सोबत घेत आदिवासींची श्रमिक संघटना स्थापन केली. त्याचसोबत ते ‘मागोवा’ या क्रांतिकारी गटाचे सदस्य होते. नंदूरबारमधील आदिवासींच्या लढ्यात त्यांना जमिनदारांच्या हल्ल्यालाही सामोरे जावे लागले होते. या यशस्वी लढ्यानंतर त्यांचे काही सहकारी शहरात परतले. मात्र, शिराळकर नंदूरबारमध्येच स्थायिक झाले. त्यांनी 1982 मध्ये मार्क्सवादी कम्यु्निस्ट पक्षात प्रवेश केला. माकपशी संबंधित असलेल्या अखिल भारतीय शेतमजूर युनियनमध्ये सक्रिय होते. या संघटनेचे कें राज्य सरचिटणीस आणि नंतर राष्ट्रीय सहसचिव म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. शिराळकर यांनी दलित पँथर चळवळ, मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत सहभाग नोंदवला होता. नामांतर चळवळीत त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.
आदिवासींना कसत असलेल्या जमिनीचा अधिकार देणाऱ्या वनाधिकार कायद्याची नियमावली बनवण्यासाठी शिराळकर भारतभर पायपीट करून त्या कायद्याच्या अंमलबजावणीत मोठी कामगिरी केली.
Belgaum Varta Belgaum Varta