मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र ईडीनं कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायलाच हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे.
कोर्टात काय-काय झालं?
मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयानं दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती देशपांडे यांच्यासमोर पार पडली. मात्र कोर्टाच्या निर्णयावर ईडीच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला आहे. तसेच, या जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. हे छोटंमोठं प्रकरण नाही, मोठी नावं यात सहभागी आहेत. त्यामुळे या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायलाच हवी अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली आहे. या आठवड्याचे केवळ दोन कामकाजाचे दिवस बाकी आहे. त्यामुळे किमान या आठवड्याभराची स्थगिती द्यावी. जेणेकरून आम्ही या निकालाचा अभ्यासकरून येत्या आठवड्यात हायकोर्टात दाद मागू शकू, असा युक्तिवाद ईडीच्यावतीनं करण्यात आला आहे. दरम्यान, जामीनाबाबत आज दुपारी 3 वाजता न्यायालय निकाल देणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta