संजय राऊत यांची मागणी
मुंबई : वीर सावरकरांबद्दल ढोंगी प्रेम दाखवू नका, त्यांना भारतरत्न द्या, ही शिवसेनेची मागणी असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. गेल्या 15 वर्षापासून आम्ही ही मागणी करत आहोत. पण त्यांना भारतरत्न का दिला जात नाही? असा सवालही राऊतांनी सरकारला केला. सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावामागे आपोआपच पदव्या लागलेल्या असतात असेही ते म्हणाले. सावरकर हे हिंदूहृयसम्राट होते, त्यांच्यानंतर बाळासाहेब हेच हिंदूहृदयसम्राट असल्याचे राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी तुम्हाला इतकेच प्रेम असेल तर त्यांना देखील भारतरत्न द्यावा, असेही राऊत म्हणाले. या पदव्या दिल्यामुळे सावरकर किंवा बाळासाहेब मोठे होणार नाहीत, तर पदव्या मोठ्या होतील असेही राऊत म्हणाले.
बाळासाहेबांच्या विचारांची मशाल फक्त निष्ठावंतांच्या हातात
बाळासाहेबांच्या विचारांची मशाल ही फक्त निष्ठावंतांच्याच हातात असू शकते. कारण बाळासाहेबांनी त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये निष्ठा आणि अस्मिता या शब्दाला महत्व प्राप्त करुन दिलं आहे. त्याच तेज कोणालाही हिरावून घेता येणार नसल्याचे संजय राऊत म्हणाले. शिवसेनाप्रमुखांना जाऊन दहा वर्ष झाली. त्यांच्यानंतर शिवसेना तोडण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षांनी केल्याचे राऊत म्हणाले. आता जे म्हणतायेत बाळासाहेबांचा विचार आमचा, ते ढोंगी आहेत. बाळासाहेबांनी सतत ढोंगाचा तिरस्कार केल्याचे राऊत म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta