जत तालुक्यातील आता उमराणी ग्रामस्थांचा जाहीर इशारा, तिकोंडीत बोम्मईंचा फलक
सांगली : सहा महिन्यांच्या आत पाण्याचा प्रश्नाचे मार्गी लावला नाही, तर कर्नाटकात सामील होण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा जाहीर इशारा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या उमराणी ग्रामस्थांनी दिला आहे. कर्नाटकचे मुख्मंत्री बसवराज बोम्मई यांचा अभिनंदन ठरावही ग्रामस्थ करणार आहेत. सहा महिन्याच्या आत पाण्याचा प्रश्नाचे मार्गी लावला नाही, तर आपण कर्नाटकमध्ये जायला मागेपुढे पाहणार नाही अशा पद्धतीचा ठराव करून महाराष्ट्र सरकारला इशारा देणार आहेत. उमराणी गावातील बस स्टँडवर सर्वपक्षीय लोक एकत्र येऊन ठराव मांडणार आहेत.
उमराणी गावच्या ग्रामस्थांनी म्हटले आहे की, आज कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन ठराव करायचा आहे, तरी आपण कोणीही राजकारण न आणता गावातील एसटी स्टँडवर एकत्र यावे. सहा महिन्यांच्या आत पाणी प्रश्न मार्गी लागला नाही, तर आपण कर्नाटकमध्ये जायला मागेपुढे पाहणार नाही, अशा पद्धतीचा ठराव आपण करायचा आहे. देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली, तरी रस्त्यांच्या विकास झालेला नाही, पाणी नाही, कोणत्याही प्रकारच्या विकासापासून आपण वंचित आहोत, तरी आपण आता पेटून उठलं पाहिजे. उमराणीत येणारी कर्नाटकची अथणी बसचे पूजन करून तसेच ठराव मांडून महाराष्ट्राच्या नेत्यांना संदेश देऊया.
कर्नाटकच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री बोम्मईंचा फलक लावला
दुसरीकडे जत तालुक्यातील तिकोंडीत काही ग्रामस्थांनी गावातून फेरी काढत आणि मुख्यमंत्री बोम्मईंचा फलक गावच्या कमानीवर लावल्याने महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यातील वातावरण तापले आहे. आम्ही कर्नाटकमध्ये जाण्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे. गावातील कमानीवर कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मईं यांचा फोटो असलेला फलक लावण्यात आला होता. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप करून फलक काढला. कर्नाटकात जाण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊ, असे ग्रामस्थांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta