मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात निर्णायक वळणावर असताना दोन्ही राज्यात राजकारण तापले आहे. महाराष्ट्र सरकारची बाजू भक्कम असल्यामुळे कर्नाटक सरकारचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे कर्नाटक सरकारने रडीचा डाव मांडला आहे.
महाराष्ट्राचे समन्वयक मंत्री बेळगांव दौऱ्यावर येणार होते त्यांना कर्नाटक सरकारने हेतुपुरस्सर प्रवेशबंदी केली तर विविध कन्नड संघटनांनी निदर्शने करत या दौऱ्याला विरोध दर्शविला आहे तर करवेच्या म्होरक्यांनी हिरेबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड करत धुडघुस घातला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या समिती नेत्यांना व कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. सीमाभागातील एकंदर वातावरण पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन कर्नाटक सरकारने सहकार्याची भूमिका न दाखविल्यास येत्या 48 तासात आपण स्वतः बेळगावमध्ये जाऊ, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावर आता कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. सीमाप्रश्नी राज्य सरकारने कठोर भूमिका घेणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही. महाराष्ट्राच्या वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत तर वेगळी भूमिका घ्यावी लागेल. त्यानंतर होणाऱ्या परिणामाचा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई जबाबदार असतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेत्यांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधला असता शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे की, येत्या 48 तासात कन्नड संघटनांची गुंडगिरी थांबविली नाही तर स्वतः जातिनिशी बेळगावात हजर राहणार असल्याचे सांगितले. शरद पवार बेळगावमध्ये येताच त्यांच्या स्वागतासाठी मराठी भाषिकांनी बहुसंख्येने भगव्या धवजासह उपस्थित रहावे, असे आवाहन माध्यवर्ती म. ए. समितीने केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta