Thursday , December 5 2024
Breaking News

‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडास आवर घालावा आणि…’ राज ठाकरेंचा सूचक इशारा!

Spread the love

 

मुंबई : महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटल्याचे दिसत आहे. याशिवाय, शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांचा बेळगाव दौरा रद्द झालेला असल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरणही तापलेलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडूनही वादग्रस्त वक्तव्ये सुरूच आहेत. अशातच काल बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना सूचक इशारा दिला आहे.

राज ठाकरे म्हणाले, ‘कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं.’

याशिवाय राज ठाकरे यांनी याच संदर्भात ट्विटर आणि फेसबुकवर एक पत्रही पोस्ट केलं आहे. ज्यामध्ये राज ठाकरे म्हणतात, ‘मी मध्यंतरी बोललो तसं, महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालतंय हे तर उघड दिसतंय, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तत्काळ थांबवा.’

तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल
याशिवाय ‘हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा, पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते ह्याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका. येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जातंय. माझं मराठी बांधवांनाही हे सांगणं असेल की त्यांना जे हवंय ते नाही द्यायचं आपल्याला जे हवंय तेच आपण करायचं.’ असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

शिवशाही बसचा भीषण अपघात; १५ प्रवासी ठार

Spread the love  गोंदिया : शिवशाही बस उलटून १५ प्रवासी ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२९) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *