नवी दिल्ली : शिवसेना निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचा याबाबतची सुनावणी आजपासून निवडणूक आयोगासमोर सुरू झााली. शिवसेना पक्षप्रमुख पदी उद्धव ठाकरे यांची करण्यात आलेली निवड बेकायदेशीर असल्याचा दावा शिंदे गटाचे वकील ऍड. महेश जेठमलानी यांनी केला. शिंदे यांची निवड जुलै 2022 ही राष्ट्रीय कार्यकारिणीने केली आहे, त्यामुळे ही निवड योग्य असल्याचा दावा जेठमलानी यांनी केला. सादिक अली प्रकरणाचा दाखला देत शिवसेना पक्षावर आमचा दावा असल्याचे शिंदे गटाचे वकील ऍड. मनिंदर सिंह यांनी केला. तर, सुप्रीम कोर्टाचा सत्ता संघर्ष प्रकरणी निकाल येईपर्यंत आयोगाने कोणतीही सुनावणी घेऊ नये असा युक्तिवाद शिवसेना ठाकरे गटाचे वकील ऍड. कपिल सिब्बल यांनी केला. निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूच्या वकिलांनी कायद्याचा कीस पाडला. आजची सुनावणी संपली असून पुढील सुनावणीची तारीख निवडणूक आयोग जाहीर करणार आहे. जाणून घेऊयात कोणी काय युक्तिवाद केला…
बाळासाहेबांच्या निधनानंतरचे बदल बेकायदेशीर
शिंदे गटाचे वकील ऍड. महेश जेठमलानी यांनी म्हटले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर घेण्यात आलेले निर्णय, संघटनात्मक बदल हे बेकायदेशीर आहेत. शिवसेनेची जुनी घटना ही बाळासाहेब ठाकरे केंद्रीत होती. शिवसेनेच्या घटनेत कोणताही बदल न करता पक्षप्रमुख म्हणून पद निर्मिती करण्यात आली असल्याचा दावा शिंदे गटाने केला. पक्षप्रमुख म्हणून राहण्याचा अधिकारी ठाकरेंकडे नसल्याचा दावा शिंदे गटाने केला.
शिंदे गटाचे वकील ऍड. मनिंदर सिंह यांनी सादिक अली प्रकरणाचा हवाला दिला. कायद्यानुसार, शिंदे गटाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दिले पाहिजे असा युक्तिवाद केला. निवडणूक चिन्हाबाबत तातडीने निर्णय झाला पाहिजे असा मुद्दाही त्यांनी मांडला. अशिक्षित, गरीब मतदारांसाठी निवडणूक चिन्ह महत्त्वाचे असते. त्या माध्यमातून पक्षाचा प्रचार होत असतो, असा दावा ऍड. सिंह यांनी केला. निवडणूक चिन्हाबाबत आधी निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे ऍड. सिंह यांनी म्हटले.