कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर मोठी घडामोड घडत आहे. सत्तांतर झाल्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. कागल आणि पुण्यातील घरांवर हे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याची माहिती मिळत कागल येथील घराबाहेर मुश्रीफ यांच्या समर्थकांनी एकत्र येण्यास सुरुवात केली आहे.
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणीच ईडीने ही धाड मारल्याची माहिती मिळत आहे. ईडीचे पथक सकाळी कागल येथील हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. सकाळपासून पथकाने मुश्रीफ यांच्या घराची तपासणी सुरु केली आहे. तसेच, घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी दररोज जनता दरबार भरतो. विविध कामांसाठी लोकांची गर्दी त्यांच्या घरी जमते. मात्र, लोक येण्यापूर्वीच ईडीने निवासस्थानाचा ताबा घेतला होता. याची माहिती मिळताच कार्यकर्ते एकत्र येण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. तसेच, ही कारवाई सुडबुद्धीने केल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला आहे.